
सामना ऑनलाईन । मुंबई
व्हर्सटाईल सिंगर म्हणून नेहमी उल्लेख होतो तो किशोरकुमार यांचा…जादुई आवाजाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गाण्यांनी आजही अनेकांना भुरळ पडते. किशोरकुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९मध्ये मध्यप्रदेशमधील खंडवा शहरात झाला. त्यांचे नाव आभासकुमार गांगुली होते. त्यांनी शिकारी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांचे मोठे भाऊ अशोककुमार यांची प्रमुख भूमिका होती. जिद्दी चित्रपटात किशोरकुमार यांनी देव आनंद यांच्यासाठी पार्श्वगायन केले होते. मरने की दुआए कौन करे हे त्यांचे पहिले गाणे होते.
‘मेरे मेहबूब…’, ‘आ चल के तुझे…’, ‘आने वाला पल…’, ‘बचना ए हसीनो…’ यासारखी त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली. ‘चलती का नाम जिंदगी’, ‘बढ़ती का नाम दाढ़ी’, ‘दूर का राही’, ‘दूर गगन की छांव में’ या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शनही केले. त्यांना आठ वेळा फिल्मफेअरचे बेस्ट सिंगरचे पारितोषिक मिळाले. त्यांचा विनोदी अभिनय रसिकांना भावला. मात्र, गाण्याशिवाय त्यांचे मन कशातच रमले नाही. विविध नवीन धून तयार करणे, नवीन चालीवर गाणी म्हणणे त्यांना आवडायचे. त्यांची गायकी जिमी रॉजर आणि टेक्स मॉर्रटनशी मिळतीजुळती होती.
कॉलेजच्या दिवसात किशोरकुमार कॅंटीनमधून उधारीवर घेऊन स्वतः खात आणि मित्रांनाही खिलवत असत. कँटीनमध्ये उधारी राहिलेल्या पाच रुपये बारा आणे या शिलकीतून त्यांना पाच रुपय्या बारा आना ही धून सूचली आणि त्यांनी ती गाण्यात वापरलीदेखील. तरुणांनाही ती खूप आवडली. कॅंटीनमध्ये राहिलेल्या उधारीतून गााण्याची धून सूचणारा गायक अवलियाच म्हणायला हवा. अशा या गायकाने १३ ऑक्टोबर १९८७ मध्ये जगाचा निरोप घेतला.
























































