
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची निवड झाली आहे. किशोरी पेडणेकर या पालिकेतील पहिल्याच महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत. पालिकेच्या विशेष महासभेत आज ही घोषणा करण्यात आली. याशिवाय पालिकेच्या वैधानिक समित्या असलेल्या स्थायी, सुधार, शिक्षण आणि विधी समिती सदस्यांच्या नावांची घोषणाही यावेळी करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेची साडेचार वर्षांनंतर आज पहिली विशेष सभा पार पडली. महापौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी यांची निवड झाल्यानंतर आता महासभा आणि वैधानिक समित्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कारभाराला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती, शिक्षण समिती आणि सुधार समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर रितू तावडे यांनी महापालिकेतील समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली. यानुसार स्थायी समिती आणि सुधार समितीवर 26 जणांची तर शिक्षण समितीवर 22 जणांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबलच्या आधारे या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
स्थायी समितीत शिवसेनेचे सात शिलेदार
स्थायी समितीवर शिवसेनेचे सात नगरसेवक नियुक्त झाले आहेत. यामध्ये नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक यशोधर फणसे, रमाकांत रहाटे, दीपमाला बढे, मीनाक्षी पाटणकर, टी. जगदीश, लक्ष्मी भाटिया यांचा समावेश आहे.
25 वर्षांतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या
मुंबई महापालिकेत 1998 मध्ये महापौरांसह परिषद पद्धती लागू करण्यात आली होती. त्यानंतर 1999 मध्ये ही पद्धत रद्द करून जुन्या पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. याच काळात उपमहापौर आणि विरोधी पक्षनेता या पदांची तरतूद करण्यात आली. 2000 सालापासून विरोधी पक्षनेते पद अस्तित्वात आले असून गेल्या 25 वर्षांतील किशोरी पेडणेकर या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या आहेत.





























































