स्वयंपाक घरातील अपघात टाळण्यासाठी अशा प्रकारे घ्या काळजी

स्वयंपाकघरात महिलांसोबत अनेकदा छोट्या घटना घडत असतात. हात भाजणे, बोट चिरणं, खोबरं किसताना सोबत बोट किसलं जातं. या छोट्या अपघातांसोबतच कधी कधी थोडं दुर्लक्ष जरी झालं तरी मोठी घटना घडू शकते. हे असे अपघात टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हे अपघात आपल्या जीवावर देखील बेतू शकतात. वाचा त्या संर्दभातील काही महत्त्वाच्या टीप्स –

– स्वयंपाकघरातील सिलिंडर, मिक्सर, इंडक्शन, सुरी, कात्री, विळी, कोयता अशा वस्तूंपासून अपघात होऊ शकतात.

– स्वयंपाक करून झाल्यावर, प्रत्येक वेळी सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करण्याची सवय लावून घ्या. एक तर काळजी घेणं होतं आणि सिलिंडर जास्त दिवस पण येतो.

– मिक्सरचा प्लग, वायरसह काढून ठेवावा. जेव्हा लागेल तेव्हा प्लग लावून मिक्सर चालू करावा. यामुळे एकेकदा घाईत असताना मिक्सर चालू राहतो, आणि दुसऱ्या वेळी लक्षात न आल्याने अपघात होऊ शकतो.

– चाकू, कात्री नेहमी काम झाल्यावर धुवून जाग्यावर ठेवाव्या. गडबडीत त्या तशाच राहिल्या तर भाजी वैगेरे करताना, हाताला टोचून जखम होऊ शकते.

– विळी अगदी कोपऱ्यात दुमडून ठेवावी. शक्यतो मुलं तिथे जाणार नाहीत अशा ठिकाणी. ज्या वेळी विळी वापरतो त्या वेळी, काही काम आलं तर ती दुमडून ठेवून कामाला जावं कारण उघडी असली तर गडबडीत अपघात होऊ शकतो.

– कोयता लहान मुलांच्या हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.

– विजेच्या ज्या वस्तू स्वयंपाघरात वापरतो, त्या सर्वांचे प्लग काढून ठेवावे व वापरायच्या वेळी लावून वापर करावा. जेणेकरून ते उपकरण चालू राहून होणारे अपघात टाळता येतात.

– स्वयंपाक करताना खिडक्या -दरवाजे उघडे ठेवावे. जेणेकरून गॅस लीक असेल तर अपघात टाळता येतो, पदार्थाला फोडणी दिली वा कढईत तळायचे पदार्थ करतो त्यावेळी तेल तापल्यामुळे, घरात त्याच्या वासाने खोकला वैगरे येतो तो येणार नाही. आतली हवा बाहेर गेल्याने वासाचा परिणाम होणार नाही.

– वेळोवेळी गॅसची शेगडी पूर्णपणे साफ करणं गरजेचं आहे.

– स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना लादीवर /फरशीवर पाणी पडलं असल्यास लगेच पुसून घ्यावं. नजरचुकीने राहिल्यास त्यावर कोणी घसरून पडून अपघाताची शक्यता असते.

– स्वयंपाक करताना लागणाऱ्या वस्तू हाताकडे घेऊन गॅस पेटवावा. कधी कधी गॅस पेटवून भांडं गॅसवर ठेवून जिन्नस शोधायच्या नादात, गॅस सुरु आहे हे विसरायला होतं आणि भलतंच घडतं.

– दूध शक्यतो दुधाच्या कुकरमध्ये मंद गॅस करून तापवलं तर दुधावर सायी येऊन दूध छान तापतं. आणि महत्वाचं म्हणजे दूध ऊतू जात नाही. आणि नंतरचा ते ओटा पुसण्याचं आणि साफ करण्याचं कंटाळवाणं काम करावं लागत नाही. कारण दूध तापलं का कुकर शिटी मारून सांगतो.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संध्या वाटावे यांनी ही माहिती दिली

आपली प्रतिक्रिया द्या