
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘कॉफी विथ करण’च्या वादानंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानचा सलामीवीर फलंदाज के.एल. राहुल याने आपले मौन सोडले आहे. एका टीव्ही कार्यक्रमामध्ये बोलताना त्याने यावर प्रतिक्रियादिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राहुल म्हणाला की, ‘मी त्यावेळी काहीही करू शकत नव्हतो, फक्त मी माझ्यावर आणि चारित्र्यावर विश्वास ठेवला होता.’
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी प्रसिद्ध झालेल्या ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के.एल राहुल सहभागी झाले होते. या ठिकाणी राहुल आणि पांड्याने महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्या आरोप करण्यात आला होता आणि त्यांचे निलंबनही करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकिय समितीने तपासाअंती हे निलंबन मागे घेतले होत, परंतु चौकशी सुरू होती. अद्याप यावर निर्णय आलेला नाही. सध्या दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये आपापल्या संघाचे प्रतिनिधित्त करत आहेत. याच दरम्यान राहुलने ‘इंडिया टूडे’ला एक मुलाखत दिली.

राहुल पुढे म्हणाला की, ‘तो अतिशय कठीण काळ होता. कारण लोकांनी माझा तिरस्कार करावा अशी वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. एक आठवड्यापर्यंत मी स्वत:लाच समजावत होतो की असे काही नाहीये. मी वाईट नाही हे स्वत:ला समजावत होतो. खरं सांगायचे तर मी सरावासाठी जात होतो, परत घरी येत होतो, प्लेस्टेशनमध्ये अधिक वेळ व्यतित करत होतो, कारण लोकांच्या तिरस्काराचा सामना करण्याच्या मनस्थितीमध्ये मी नव्हतो. मला लोकांची, त्यांच्या प्रश्नांची भीती वाटत होती.’ या दरम्यान, राहुलने आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सहकाऱ्यांचा, स्टाफचा आणि चाहत्यांचे आभार मानले.

























































