कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या ‘जॉब जंक्शन’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने KTI अर्थातच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट तर्फे जॉब जंक्शन या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 15 कंपन्यांनी सहभाग घेतला होता तसेच 10 वी, 12वी, पदविका प्राप्त व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी मुलाखती दिल्या. त्यापैकी 250 उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरले असून या उमेदवारांना संबंधित कंपन्यांकडून लवकरच नियुक्ती पत्र दिले जाणार असे KTI चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद वागास्कर यांनी सांगितले.

कौशल्य विकास अंतर्गत राज्यभरातील व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या विविध सरकारी आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात कुशल विद्यार्थी घडवायचे काम करीत आहेत. मात्र या विद्यार्थ्याना नोकरीची संधी निर्माण व्हावी म्हणून KTI ने प्रथमच जॉब जंक्शन रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुंबई , ठाणे, पालघर, माणगाव कोकण, या भागातील शेकडो विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या, ‘जॉब जंक्शन’ या रोजगार मेळाव्याबाबत बोलताना KTI चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद वागास्कर यांनी सांगितले की “विविध क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये अंनेक रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस निर्माण होत आहे. मात्र अनेकवेळा कुशल कामगारांची आवश्यकता या कंपन्यांना भासत असते. केवळ व्यावसायिक प्रशिक्षण नव्हेच तर अशा प्रशिक्षित विद्यार्थ्याना रोजगारही मिळावा यासाठी KTI प्रयत्नशील आहे. रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी यांच्यातील दुवा म्हणून KTI ने विद्यार्थ्यांचे करीयर घडविण्यासाठी जॉब जंक्शन चे व्यासपीठ उपलब्द्ध करून दिले आहे तसेच येत्या काळात महाराष्ट्रभर जॉब्झ जंक्शन द्वारे नोकरीच्या अनेक संधी KTI उपलब्ध करून देणार आहे.”

आपली प्रतिक्रिया द्या