
कोकणात पावसाचे थैमान अजून सुरूच आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसादरम्यान पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळली असून सात कुंटूब दरडीखाली अडकली असावी अशी भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 7 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेले चार दिवस कोकणात ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडत आल्याने कोकणातील सर्वच जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे. रायगड जिल्हयातील महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण ही दोन्ही शहरे गेले कित्येक तास पाण्याखाली आहेत. चिपळूणमध्ये शेकडो नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी आता एनडीआरएफची पथकं चिपळूणमध्ये दाखल झाली आहेत.
दरम्यान गुरुवारी रात्री खेड तालुक्यातील धामणंद पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याने सात कुटुंबे बाधित झाली. उपलब्ध झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सात कुटुंबातील 17 जण दरडीखाली अडकले असावेत असा अंदाज आहे. या दुर्घटनेत 7 जण जखमी असून त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोठ्यात बांधलेली चोवीस जनावरेही जखमी झाली आहेत.
परिसरातील नागरिक मदतीसाठी पोहोचली आहे. मात्र शासकीय यंत्रणा अद्याप पोहोचलेली नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. दरम्यान खेड शहरात भरलेले पाणी पहाटे 4 वाजल्यापासून ओसरायला सुरवात झाली आहे. 10 वाजेपर्यत शहरातील पाणी पूर्णपणे ओसरले होते. मात्र शहरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने रस्त्यावरून चालणे ही शक्य नाही. नगरपालिका प्रशासनाने अग्रिशमन गाड्यांच्या सहाय्याने शहरातील रस्ते साफ करण्याचे काम हाती घेतले आहे.

























































