कोकणसह नवा महाराष्ट्र घडवू या!

470

कोकणचा कॅलिफोर्निया करू अशा घोषणा काही जण करत असतील, मी अशा घोषणा करणार नाही. पण जगाला हेवा वाटेल असा कोकण घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सर्वांचे सहकार्य आणि जनतेच्या आशीर्वादाची ताकद या बळावर तुम्हाला अभिमान वाटेल असा कोकणसह नवा महाराष्ट्र घडवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच कोकण दौऱयावर आले होते. गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकासाच्या 102 कोटींच्या आराखडय़ाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या सोहळय़ासाठी रत्नागिरीवासीयांची प्रचंड गर्दी उसळली होती. कोकण आणि शिवसेनेचे नाते अतूट आहे. या अतूट नात्याच्या आशीर्वादावरच शिवसेना महाराष्ट्रात नव्हे तर देशात पुढे जात आहे. आज माझा तीर्थयात्रांचा दिवस आहे आणि गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाचे अनावरण माझ्या हस्ते झाले हे माझे भाग्य आहे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

हे आकड्यांचे सरकार नाही

या आधी अनेक वर्षे कोकणाला स्वप्ने दाखविली गेली. पण मी स्वप्ने दाखवायला नाही तर स्वप्ने पूर्ण करायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळय़ांचा कडकडाट झाला. मी नुसते आकडे लावत नाही किंवा आकडा बोलत नाही कारण आपले सरकार आकडय़ांचे नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, हुस्नबानू खलिफे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, सभापती प्राजक्ता पाटील, गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

गणपतीपुळ्याचा विकास आराखडा 102 कोटींचा – उदय सामंत

गणपतीपुळे विकास आराखडय़ाबाबत सामंत म्हणाले की, चार वर्षांपूर्वी येथील जिल्हाधिकाऱयांनी गणपतीपुळय़ाचा विकास आराखडा तीस ते चाळीस कोटींचा तयार केला होता. त्यानंतर आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मदतीने हा आराखडा 102 कोटींवर नेला असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

श्री क्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकासाच्या 102 कोटींच्या आराखडय़ाच्या नकाशाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. तसेच पाणी योजनेचे पत्र पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केले.

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही!

कोकणच्या विकासासाठी जे काही आराखडे तयार करायचे आहेत ते करा. विकासासाठी जो निधी लागेल तो मिळेलच. तिथे काही अडणार नाहीच आणि अडले तर मी तिथे आहेच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. ते पुढे म्हणाले की, यंदा पावसात अनेक रस्ते खराब झाले. साकव वाहून गेले. त्यासाठी निधी देण्याची जबाबदारी आपली आहेच.

आपली प्रतिक्रिया द्या