कोल्हापुरातील 25 लाख नागरिकांना 5 किलो मोफत धान्य; फेरीवाले, रिक्षावाल्यांना मिळणार अडीच कोटींच्या पॅकेजचा लाभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवार (दि.14) रात्री 8 पासून ते येत्या दि. 1 मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात गोरगरीब, निराधार, कष्टकरी जनतेची चूल विझू न देता, त्यांना रोटी देण्याचे धोरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम 5 हजार 476 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यानुसार जिल्ह्यात सुमारे 4 हजारहून अधिक नागरिकांना मोफत शिवभोजन थाळीसह 25 लाख नागरिकांना प्रत्येकी 5 किलो मोफत धान्य, तर फेरीवाले आणि रिक्षाचालकांना सुमारे अडीच कोटींच्या पॅकेजचा लाभ मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 5 लाख 59 हजार 566 रेशनकार्डधारक असून, याद्वारे प्रतिव्यक्ती अशा 25 लाख 8 हजार 532 नागरिकांना संचारबंदीकाळात अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे.

साडेसहा हजार नोंदणीकृत फेरीवाल्यांना मदत

सर्वपक्षीय कृती समितीकडून शहरात सुमारे 11 ते 12 हजार फेरीवाले असल्याचा दावा केला जात असला तरी महानगरपालिकेच्या नोंदणीनुसार साडेसहा हजार फेरीवाल्यांची नोंदणी आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये मदत होणार आहे.

16 हजार रिक्षाचालकांना अडीच कोटी

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण रिक्षांची संख्या 20 ते 25 हजार असून, शहरात तब्बल 18 हजारांवर रिक्षांची नोंद आहे. प्रत्यक्ष परमीटधारक 16 हजारच्या घरात असून, त्यांना प्रत्येकी 1500 रुपयांची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे.

45 हजार बांधकाम कामगारांना मिळणार मदत

जिल्ह्यात सुमारे 60 हजारांहून अधिक बांधकाम कामगारांची नोंद आहे. गेल्यावेळी कोरोनाकाळात पाच हजारांचे अनुदान मिळाले होते. यावेळी पंधराशे रुपये अनुदान मिळणार आहे. आता नोंदणी केलेल्या अशा कामगारांची संख्या 45 हजारांच्या घरात आहे. याशिवाय घरेलू मोलकरीण या वर्गालाही राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. जिल्ह्यात सध्या ऑनलाइन नोंदणीकृत घरेलू मोलकरणींची संख्या पाचशेहून अधिक आहे.

दररोज चार हजार मोफत शिवभोजन थाळी

गोरगरीब, कष्टकरी वर्ग उपाशी राहू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडीने सत्तेवर येताच, राज्यात सर्वत्र दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात ही थाळी पाच रुपयांत देण्यात येत होती. आता कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेत संचारबंदीच्या काळात ही थाळी मोफत देण्यात येणार असून, जिल्ह्यात 37 आणि शहरातील 9 केंद्रांतून सुमारे चार हजारहून अधिक गरजूंना या शिवभोजन थाळीचा लाभ होणार आहे.