
कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱया पायी दिंडीत कार घुसल्याने सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुनोनी (ता. सांगोला) येथे सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये पाच महिला, एक मुलगा यांचा समावेश आहे. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी आणि मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
शारदा आनंदा मेडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, सुनीता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव, सर्जेराव श्रीपती जाधव व गौरव पवार (वय 14) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहे.
जठारवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील वारकरी कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे पायी जात होते. मिरजकडून आलेल्या ‘टाटा नेक्सन’ या गाडीच्या चालकाचा ताबा सुटून ही गाडी वारकऱयांच्या दिंडीत घुसली आणि सात वारकऱयांचा जागीच मृत्यू झाला. हे वारकरी जुनोनी येथीलच एका वस्तीवर थोडय़ा वेळाने मुक्काम करणार होते. मात्र, वस्तीवर पोहोचण्यासाठी काही वेळ असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी दाखल झाले.































































