
अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱयांच्या पीक कर्जाचे केडीसीसी बँकेत पुनर्गठन करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. यावेळी संचालक मंडळातील आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने, सर्जेराव पाटील-पेरीडकर, पी. जी. शिंदे, विलास गाताडे, अनिल पाटील, आर. के. पोवार, अशोक चराटी, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रताप उर्फ भय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील आदी सदस्य, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने उपस्थित होते.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, महापूर व भूस्खलनामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अशा बाधित शेतकऱयांना मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली 2 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय सल्लागार समितीची सभा झाली. या संदर्भातच 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीचीही सभा झाली. सरकारी पंचनाम्यानुसार 30 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान पिकांचे नुकसान झालेल्या कर्जदार शेतकऱयांच्या अल्पमुदत कर्ज व त्यावरील व्याजाचे दोन वर्षांसाठी पुनर्गठन केले जाणार आहे. त्यापैकी एक वर्ष सवलतीचा कालावधी आहे. शेतकऱयांच्या मागणीनुसार बाधित क्षेत्रासाठी नवीन पीक कर्ज दिले जाणार आहे.
50 टक्क्यांपेक्षा जास्त पिकाचे नुकसान झालेल्या कर्जदार शेतकऱयांच्या अल्पमुदत व त्यावरील व्याजाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन केले जाणार आहे. यामध्येही एक वर्ष कालावधी सवलतीचा व शेतकऱयांच्या मागणीनुसार बाधित क्षेत्रासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या योजनेत नैसर्गिक आपत्तीवेळी थकबाकीत असलेले कर्ज वगळता पीक कर्जासह अल्पमुदतीची कर्जे पुनर्रचनेसाठी पात्र आहेत. अल्पमुदत कर्ज व त्यावरील व्याज पुनर्गठित केले जाणार आहे. कर्ज असलेली शेती उपकरणे व साधनांचेही पुरामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनाही मागणीनुसार नवीन कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी शेतकऱयांकडून कोणतेही जादा तारण घेतले जाणार नाही.
पूरबाधित दुकानदारांनाही मिळणार दिलासा
केडीसीसी बँकेकडून शेतकऱयांच्या या योजनेच्या धर्तीवरच महापूरबाधित नुकसानग्रस्त दुकानदारांनाही दिलासा देणारी योजना करण्यात येत आहे, या योजनेला संचालक मंडळाच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. यासंदर्भात बँक लवकरच धोरण ठरविणार आहे.




























































