
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याची माहिती न घेता शरद पवार दुष्काळाचे राजकारण करीत असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. दुष्काळात आघाडी सरकारपेक्षा युती सरकारकडून अधिक सक्षमपणे सुरू असलेल्या कामांचा आढावाच महसूलमंत्री पाटील यांनी घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सातत्याने पाहावयास मिळाले. महाराष्ट्रातील निवडणूक संपली तरी दुष्काळाच्या प्रश्नावरून शरद पवार हे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातूनच त्यांनी सोलापुरात दुष्काळाची पाहणी केल्यानंतर हे सरकार दुष्काळाच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याची टीका केली होती. त्याला चंद्रकांत पाटील यांनी रविवारी उत्तर दिले.
शरद पवार यांच्यासारख्या जाणकार नेत्याने माहिती न घेता बोलण्याची आपणाला चिंता वाटत असल्याचा टोला लगावत, दुष्काळ निवारणात कसलीही कसूर न ठेवता ऑक्टोबर महिन्यापासूनच उपाययोजना केल्या आहेत. शिवाय आघाडी सरकारपेक्षा युती सरकारकडून अधिक मदत केली जात असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या काळात चाऱयासाठी लहान-मोठय़ा जनावरांना 20 व 40 रुपये प्रतिदिन दिले जायचे, आता ही रक्कम 45 आणि 90 रुपयांर्यंत वाढवली आहे. याची आकडेवारी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून देत, दुष्काळाचा सामना राजकारण न करता सर्वांनी मिळून करणे गरजेचे आहे. तसेच, शरद पवार यांच्या सूचनांचेही यात स्वागत केले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

























































