
सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101व्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी सर्वत्र छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता पर्वाची सांगता करताना सकाळी दहा वाजता संपूर्ण कोल्हापूरकरांनी शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून छत्रपती शाहूंना मानवंदना देत आपली कृतज्ञता व्यक्त केली.
आधुनिक हिंदुस्थानच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदानासह सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते असलेले लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दीचा कार्यक्रम गेल्या वर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला. राजर्षी शाहुंनी विविध कलागुणांना दिलेला राजाश्रय तसेच त्यांच्या सामाजिक व ऐतिहासिक कामाविषयी आणि वास्तूंविषयक योगदानाला या निमित्ताने उजाळा देण्यात आला. यंदा स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता करताना, पुन्हा एकदा राजर्षी शाहुंच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शनिवारी सकाळी सिद्धार्थ नगर येथील नर्सरी बागेतील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळी अभिवादनासाठी गर्दीचा महापूर लोटला होता. सकाळी ठीक दहा वाजता जिल्ह्यात सर्वत्र शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून, आपल्या या वंदनीय लोकराजाला अभिवादन करण्यात आले. या वेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज व माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री व आमदार सतेज पाटील, आमदार राजेश पाटील,खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. कार्य. अधिकारी संजयसिंह चव्हाण, अ. भा. मराठी महासंघाचे उपाध्यक्ष वसंत मुळीक यांच्यासह शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांचे पदाधिकारी, विविध सामाजिक, राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
दरम्यान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक श्री छ.शाहू मिल येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 14 मे पर्यंत कृतज्ञता पर्वानिमित्त विविध उपक्रम असणार आहेत. यात कार्यशाळा, चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशांचा समावेश असून हा कार्यक्रम तीन सत्रात संपन्न होईल. त्याचा प्रारंभ शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गुळ, कापड, चप्पल,सोन्या- चांदीचे दागिने, माती व बांबूंच्या वस्तू, घोंगडी, दूध उत्पादने, खाद्यपदार्थ, वन उत्पादने आदी विविध वस्तू आणि उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.


























































