कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात, रुग्णालयातील परिचारिकेला टोचवली पहिली लस

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून प्रत्यक्षात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील परिचारिका अक्षता विक्रम माने यांना वाढदिवसाची आश्चर्यकारक तीसुद्धा कोव्हीड लसीकरणाची भेट मिळाली. अक्षता माने या सेवा रुग्णालय लसीकरण केंद्राच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या. तर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. डॉ. राजेश जाधव हे या केंद्रावर पहिले लाभार्थी ठरले.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात तब्बल ३७ हजार ५८० कोव्हिड व्हॅक्सिन लस दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कोरोना योद्ध्यांना या लस देण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी शहरात ६ आणि ग्रामीण भागात ८ अशा १४ ठिकाणी लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. दिवसभरात १ हजार ४०० जणांना हि लस देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. यापार्श्वभुमीवर ड्राय रन चाचणी ही जिल्ह्यात यशस्वी झाली होती.

आजपासून प्रत्यक्षात या लसीकरणास सुरुवात झाली.कोरोनाच्या आठ ते नऊ महिन्यांच्या काळात जीवावर उदार होऊन कोरोना रुग्णांसाठी सेवा बजावणा-या आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लसीकरण केंद्राबाहेर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. फुलांच्या पायघड्या घालून, अशा कर्मचा-यांचे लसीकरण केंद्रात स्वागत केले जात होते. कसबा बावडा परिसरातील सेवा रुग्णालयात सर्वप्रथम तेथील परिचारिका अक्षता विक्रम माने यांना ही लस देण्यात आली. विशेष म्हणजे अक्षता माने यांच्या आज वाढदिनीच त्यांना ही अविस्मरणीय भेट मिळाली. तसेच सेवा रुग्णालय लसीकरण केंद्राच्या त्या पहिल्या लाभार्थी ठरल्या. त्यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

दरम्यान, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ ग्रामीण रुग्णालयांत लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. डॉ. राजेश जाधव हे या केंद्रावर पहिले लाभार्थी ठरले. यावेळी प्रांताधिकारी विकास खरात,तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, नगराध्यक्ष अमरसिंह माने, माजी आमदार उल्हास पाटील आदी उपस्थित होते. लसीकरणानंतर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुष्प देवून लाभार्थ्यांचा सत्कार केला.

आपली प्रतिक्रिया द्या