कोल्हापुरात मान्सुनपूर्व पावसाची ‘सलामी’, विजांच्या कडकडाटासह तासभर बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा

637

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच सलामी दिली. विजांच्या प्रचंड कडकडाटासह शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात तुफान पाऊस झाला. सुमारे तासभर कोसळलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. गटारी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर आल्या.

दरम्यान पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. अडीच महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर मर्यादित वेळेत सुरु झालेले व्यवसाय आणि विक्रेत्यांवरही परिणाम झाला.

रविवारी सकाळ पासुनच उकाड्याच्या त्रासाने सर्वजण हैराण झाले होते. त्यात काही काळ ढगाळ वातावरण निर्माण झाले. दुपारी अडीचच्या सुमारास वीजांचा प्रचंड कडकडाट, ढगांचा गडगडाट होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यातील काही भागाला तर सुमारे तासभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

महाराष्ट्र, गुजरातला 3 जूनला वादळ धडकण्याची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या महानगरपालिकेचे बहुतांश सर्व कर्मचारी आरोग्यासाठी कार्यरत आहेत. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी गटारी साफ मोहिम थंडावल्याने गल्लोगल्ली गटारी कच-याने तुंबलेल्या होत्या. मुसळधार पावसाने या गटरीतील कचरा वाहुन गेला. काही ठिकाणी गटरीच ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर आल्या होत्या. अनेक सखल भागात तळेच झाले होते. तर दुसरीकडे लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने मर्यादित वेळेत काही व्यवसाय दुकाने सुरू करण्यात आली आहेत. आज रविवारी बाजाराचा दिवस असतानाच, पावसाचा त्यावरही परिणाम झाला.

आपली प्रतिक्रिया द्या