मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारी उचलावी

छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) हे सर्वसामान्यांचा आधारवड आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाबाबत काम करणाऱ्या सर्व विभागांनी अत्यंत दक्षतापूर्वक आणि गांभीर्याने काम करून मृत्यूदर कमी करण्यासाठी जबाबदारी उचलावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी सीपीआर रुग्णालयातील सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर सरवदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.

रुग्णालयातील संपूर्ण कामाचा आढावा घेऊन पालकमंत्री पाटील यांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तयारी करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या वर्षी सर्वांनी समर्थपणे आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र, त्यावेळी राहिलेल्या काही उणिवा कमी करण्याची जबाबदारी आपणाला घ्यावी लागेल. वैद्यकीय क्षेत्रात जीवन-मरणाचा विषय असल्याने दुर्लक्ष तसेच हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोविड येण्यापूर्वी ओपीडी आणि आयपीडी किती होती आणि सध्या किती आहे, याचा बारकाईने विचार करून आपण कुठे कमी पडतोय, याचे चिंतन करणे आवश्यक असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

कोविड येण्यापूर्वी इतर रुग्णसंख्या मोठय़ा संख्येने असतानाही उपचाराबाबत नियोजन होत होते. सध्या कोविड रुग्णसंख्या कमी असताना कुठे कमी पडतो का, याबाबत सर्वांनी दक्ष असणे आवश्यक आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाने जास्तीचे काम करावे. सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावे. मृत्यूदर रोखण्यासाठी सक्षमपणे पावले उचलावीत, असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

सर्वसामान्यांसोबत आपुलकीचे नाते जपूया – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, एकही रुग्ण दगावणार नाही असे ध्येय प्रत्येकाने ठेवा. रुग्ण ज्या वॉर्डमध्ये उपचार घेत आहे, त्या वॉर्डमधील डॉक्टर, नर्स यांनी रुग्ण बरा होऊन घरी जाईल याची जबाबदारी घ्यावी. माझ्या डय़ुटीत एकही मृत्यू होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. ‘सीपीआर’चे सर्वसामान्यांसोबत आपुलकीचे नाते आहे. हेच नाते जपूया; खासगी रुग्णालयांपेक्षा ‘सीपीआर’ कशातही कमी नाही, हे दाखवून देवूया.

मन लावून काम करू, मृत्यूदर रोखू

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यापुढे अधिक दक्षता घेऊन 24 तास सेवा देऊ, मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न करू. आलेले रुग्ण बरे होऊन घरी जातील, याची हमी देतो, असा विश्वास उपस्थित विभागप्रमुखांच्या वतीने डॉ. सरवदे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. विजय बर्गे, डॉ. राहुल बडे यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या