
जिल्ह्यात आलेला प्रलयकारी महापूर सध्या ओसरल्याने झालेला विध्वंस आता दिसू लागला आहे. पडलेली घरे, पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेलेला संसार, जिवापाड सांभाळलेली आणि उत्पन्नाचे साधन असलेली जनावरेही वाहून गेल्याने, सर्वत्र दुःखाचे वातावरण दिसून येत आहे. महापुरामुळे कुजलेला प्रचंड कचरा, त्यातून पसरलेली दुर्गंधी आणि आजाराचे थैमान याचा सामना करण्याचे आव्हान कोल्हापूरकरांसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाचा जोर कमी होता. राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला असून, त्यातून 2 हजार 828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाण्यासाठी दाहीदिशा
महापुरामुळे जिल्ह्याचा विद्युतपुरवठा आणि पाणीपुरवठा ठप्प झाला होता. सध्या महापूर ओसरू लागल्यानंतर वीजपुरवठा हळूहळू सुरू होत आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा अजूनही सुरळीत सुरू झालेला नाही. पाणीपुरवठा सुरू होण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा विलंब लागणार असल्याने कोल्हापूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आज 15 दिवस झाले तरी दाहीदिशा भटकावे लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असली तरी अजूनही विलंब लागत असल्याने नागरिकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर अनेक भागात उपलब्ध होत नसल्याने, पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे.


























































