पाच महिलांशी संसार थाटून फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक, वीरपत्नींनाही घातला गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच महिलांशी संसार थाटून वीरपत्नींचीही फसवणुक करणा-या एका तोतया लष्करी अधिकाऱ्याला बेळगांव येथील कॅम्प पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंजुनाथ बिरादार असे त्याचे नाव असून तो नालवतवाड, जि. विजापूर गावातील आहे. लष्करी अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करण्याचा हा प्रकार समोर आल्याने, “तो मी नव्हेच” या नाटकातील लखोबा लोखंडे या पात्राची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून, कॅम्प परिसरात रूबाबात वावरत असलेल्या या भामट्याला संशयास्पद हालचालीवरुन पकडून लष्कराने कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांच्या चौकशीत त्याचे धक्कादायक बिंग बाहेर पडल्याने सर्वच अवाक झाले आहेत.

या भामट्याने लष्करात सुभेदार मेजर असल्याचे सांगून तब्ब्ल पाच जणींशी लग्न केले आहे. तसेच दहा पेक्षा अधिक शहिद जवानांच्या पत्नींना वन रँक पेन्शन देण्याचे वचन देऊन त्यांच्याकडूनच पैसे उकळले आहेत. तर लष्करात नोकरी लावतो म्हणूनही अनेक तरूणांकडुन हजारो रुपये उकळल्याचे त्याने पोलीस चौकशीत कबुल केल्याचे समोर आले आहे.

एखाद्या गावात लष्करी गणवेशात रुबाब मारत जायचे. गावातील मान्यवरांची भेट घेऊन आपण अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्यावर छाप पाडायची. तर कधी अनाथ असल्याचे सांगून लग्न करण्याची इच्छा असल्याचे सहानुभूती मिळवून त्याच गावातील मुलीशी लग्न करून महिनाभर सासुरवाडीत पाहुणचार घेऊन तो अचानक निघून जायचा.img-20201110-wa0023

तसेच गावातील शहिद कुटुंबाचा जाहीर सत्कार करून त्यांच्याशी ओळख वाढवायची. नंतर त्यांना वन रँक पेन्शन मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे अशा पद्धतीने त्याने सुमारे दहा शहीद जवानांच्या पत्नींकडून पैसे उकळले असल्याचे समोर आले आहे.