दोन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करा, खोटी प्रमाणपत्रे सादर करून 14 उमेदवारांना बाद केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोटी प्रमाणपत्र मिळवून सोलापूरमधील भोशे ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणाऱया पॅनलचे 14 उमेदवार बाद केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची दखल घेत हायकोर्टाने निवडणूक आयोगाला व प्रतिवाद्यांना फैलावर घेत याचा जाब विचारला. एवढेच नव्हे तर या प्रकरणाची दोन दिवसात चौकशी करून अहवाल सादर करा व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने दिले.

सोलापूरमधील भोशे ग्रामपंचायतीसाठी काकडे पॅनल व औताडे पॅनल इच्छुक असून या दोन्ही पॅनल चे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. त्यापैकी काकडे पॅनलने औताडे पॅनलच्या 14 उमेदवारांविरोधात ग्रामपंचायतीतून बनावट प्रमाणपत्र मिळवत हे उमेदवार ठेकेदार असल्याचा तसेच त्यांच्या जवळ शौचालय नसल्याचा दावा निवडणूक आयोगासमोर केला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने औताडे पॅनलचे 14 उमेदवार बाद केले. या विरोधात औताडे पॅनलच्या भाग्यश्री गायकवाड व कर्मवीर औताडे यांनी अॅड. दिलीप बोडके यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.