मतदान केंद्रानंतर आता मतमोजणी केंद्रावरही जादुटोणा, करवीर नगरीत चर्चेला उधाण

मतदान केंद्रापाठोपाठ आता मतमोजणी केंद्रातही जादुटोण्याचा प्रकार आज उघडकीस आल्याने करवीर नगरीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. रमणमळा परिसरात मतमोजणी केंद्राबाहेर ही घटना घडली.

कोल्हापूर जिल्ह्यात 433 पैकी 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 386 ग्रामपंचायतीसाठी अत्यंत इर्षेने मतदान झाले होते. यादरम्यान मतदान केंद्राबाहेरच लिंबू आणि उतारे टाकल्याचे दिसून आल्याने अनेकांनी याबाबत तक्रारी सुद्धा केल्या होत्या. जिल्ह्यात झालेले हे मतदान राज्यात अव्वल ठरल्याने या जादुटोणाकडे दुर्लक्ष झाले होते.

एकीकडे आज मतमोजणीमुळे सर्वांना निकालाची धाकधुक लागली असतानाच, दुसरीकडे मात्र चक्क मतमोजणी उमेदवार प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्या एका व्यक्तीकडे लिंबू आणि भंडारा सापडल्याचे समोर आल्याने चर्चेला उधाण आले होते. कसबा बावडा येथील रमणमळा परिसरात मतमोजणी केंद्राबाहेर ही घटना घडली.

संबंधिताकडून पोलिसांनी लिंबू आणि भंडारा काढून घेतला. पण ताब्यात घेताना ही व्यक्ती पोलिसांच्या हाती लिंबु आणि भंडारा देऊन पसार होण्यात यशस्वी झाली. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कसलाही गुन्हा दाखल झाला नव्हता. शिवाय कोणीही तक्रारीसाठी पुढे आले नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या