
कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारी विजांच्या कडकडाटात आलेल्या मुसळधार पावसाने झोडपले. कोल्हापूर शहरासह 20 कि.मी.च्या परिघात झालेल्या या जोरदार पावसामुळे गणेश मंडळांची तारांबळ उडाली. दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
सकाळपासून उष्म्याने नागरिकांना हैराण केले होते. शहर आणि जिह्यात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. सुमारे पाऊण तास एकसारखा पाऊस कोसळत होता. या पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या पावसामुळे गणेश मंडळांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातील ओढय़ांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नगर जिह्यातही आगामी चार-पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. बाप्पाच्या विसर्जनादरम्यानही जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे गणेशभक्तही काळजीत आहे.




























































