कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरात चोरी, चांदीचे मुकुंट-पंचारती घेऊन पोबारा

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

नवदुर्गा पैकी एक असलेल्या प्रसिद्ध श्री. कात्यायनी मंदिराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट, पंचारती, असे सुमारे दोन किलो वजनाची चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना आज पहाटे उघडकीस आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापनाखाली हे मंदिर असून, सुरक्षेच्या बाबतीत समितीकडून दुर्लक्ष झाल्यानेच ही घटना घडली आहे.

कळंबा परिसराच्या पुढे तसेच शहरापासून अवघ्या आठ ते दहा कि.मी. अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात असलेल्या श्री. कात्यायनी मंदिराला पुरातन महत्व आहे. करवीर महात्म्यातही देवीचा उल्लेख आहे. बलिंगा येथील रामचंद्र विष्णू गुरव हे या मंदिराचे पुजारी असून, मंदिर परिसरातच ते कुटुंबासह राहतात. आज पहाटे नेहमी प्रमाणे ते पूजेसाठी आले असता, मंदिराचा दरवाजा तुटलेला दिसला. देवीच्या गाभाऱ्यातील संस्थानाच्या काळापासून वापरात असलेले चांदीचे दोन मुकुट, पंचारती असा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. मंदिराबाहेर दर्शन मंडपातील लोखंडी कपाट उचकटले होते. चोरीचा प्रकार लक्षात येताच गुरव यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यामुळे करवीर पोलीस उपधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.

चोरट्यांनी मंदिरातील दोन चांदीची ताटे, देणगीची काही रक्कम तसेच पितळेची भांड्याना हात लावलेला नाही. शिवाय गाभाऱ्यातील कपाटे कुलुपं काढून चोरी झाली आहे. त्यामुळे चोरट्यांच्या हेतू विषयी शंका निर्माण झाली आहे. श्वान पथकातील श्वानाने मंदिराच्या आवरातून मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला.

सीसीटीव्ही बंद

देवस्थान समितीकडून सुरक्षेची कसलीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. मंदिरात सुरक्षा रक्षक ही नसल्याने पुजारी गुरव यांनी स्वतः सहा सीसीटीव्ही बसवले आहेत. पण गेल्या तीन दिवसापासून ते बंद असल्याचे पाहून एखाद्या माहितगारानेच ही चोरी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.