
‘आपल्या घरातील उजेड हेच आमचे पदक’ या भावनेतून स्वतःच्या जीवाची बाजी लावत थेट पुराच्या पाण्यात उतरून खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य महावितरणचे प्रकाशदूत बजावत आहेत.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीच्या पुराच्या वेगवान प्रवाहात पोहत जाऊन कोवाड शाखेच्या जनमित्रांनी कागणीसह सात गावांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जीवाची बाजी लावली. दोन तास वीज वाहिनीवर काम करून कागणी 11 केव्ही गावठाण फिडरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला.
आपल्या घरातील उजेड हेच आमचे पदक! थेट पुराच्या पाण्यात उतरून, प्रसंगी पोहून जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करताहेत महावितरणचे 'प्रकाशदूत' #rain #Maharashtra #saamanaonline pic.twitter.com/CI2NpyW3GE
— Saamana (@SaamanaOnline) July 27, 2023
कागणी, कल्याणपूर, बुक्कीहाळ खुर्द, बुक्कीहाळ बुद्रुक, कौलगे, होसुर, किटवाड, हुंदळेवाडी या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य पार पाडले. सहायक अभियंता संजय मगदूम यांच्या नेतृत्वात जनमित्र नागोजी पाटील, अजित परीट यांनी ही धाडसी कामगिरी केली. राम शिरढोने, युवराज कोकितकर, मारुती पाटील, विलास कदम, नागनाथ नांदवडेकर यांनी यावेळी सहकार्य केले.
कोल्हापूर शहर पश्चिम विभागातील फुलेवाडी व दुधाळी शाखेच्या जनमित्रांनी पुराच्या पाण्यात बोटीतून जाऊन 11 केव्ही लक्षतीर्थ फिडरवर तांत्रिक दुरुस्ती कार्य केले. तत्पुर्वी या फिडरवर बिघाड झाल्याने मीराबाग व लक्षतीर्थ परिसरातील सुमारे 9 हजार ग्राहकांना पर्यायी वीजपुरवठ्याची सोय करण्यात आली होती.
दुरूस्तीनंतर पुन्हा लक्षतीर्थ फिडरवरून त्या ग्राहकांना वीजपुरवठा सुरू करण्यात आला. अतिरिक्त कार्य.बअभियंता राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता मनोहर पवार,जनमित्र संदीप पाटील, संजय राठोड, संदीप फारणे, युवराज जाधव यांनी ही कामगिरी केली.































































