श्री अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाचे खोदकाम, अनेक जुन्या मूर्ती-वीरगळ सापडले

करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरातील प्राचीन व गेल्या 60-65 वर्षांपूर्वी बुजविण्यात आलेला मनकर्णिका कुंड आता पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली खुला होऊ लागला आहे. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून आतापर्यंत सुमारे 8 मीटरपर्यंत खोदकाम झाले असून, अजून सुमारे चार ते पाच मीटर खोदकाम होणार आहे.

येत्या आठवडाभरात या प्राचीन कुंडाचे स्वरुप अधिक स्पष्ट होणार आहे. या खोदकामात तांब्या-पितळीची जुनी भांडी, मूर्ती, नाणी, कंदील, जर्मन बनावटीची लहान बंदूक, काही जिवंत काडतुसे आढळली आहेत. जिवंत पाण्याचे झरे, वीरगळांसह बुद्धांच्या मूर्तींचे मुखसुद्धा सापडल्याची माहिती प. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख व देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पवार, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, पुरातत्व खात्याचे उत्तम कांबळे, मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर आदी उपस्थित होते.

श्री अंबाबाई मंदिर परिसरात घाटी दरवाजा लगत, 6 हजार 800 चौ.फुटातील ही मनकर्णिका कुंडाची जागा सन 1957 मध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक बागेसाठी देण्यात आली होती. पण कालांतराने या जागेवर शौचालय बांधण्यात आले. प्राचीन कुंडाची ही जागा पुर्ववत खुली व्हावी यासाठी जनतेतून पडसाद उमटु लागले.

संतप्त शिवसैनिकांनी तर हे शौचालय उद्ध्वस्त केले. त्यानंतर 16 जानेवारी 2020 रोजी महापालिकेकडून ही जागा देवस्थानकडे परत देण्यात आली. गेल्यावर्षी 5 जुलै पासून सभोवताली बंदिस्त करून, हे कुंड खुले करण्यात येत आहे. हा कुंड किती खोल व मापाचा आहे, यांचा अभ्यास करून अवजड मशिनरी ऐवजी मनुष्यबळाचा वापर करत, जुन्या बांधकामास धक्का न लागता खोदकाम करण्यात येत आहे. अपेक्षित 6 मीटर पेक्षा जादा उत्खनन करावे लागत असुन, आतापर्यंत 8 मीटर (26 फुट 3 इंच) खोदकाम झालं आहे. आणखी 4 मीटर (13 फुट) खोदकाम करावं लागणार आहे. त्यासाठी एक ते दीड महिना कालावधी लागेल असे महेश जाधव यांनी यावेळी सांगितले.

खोदकामात आढळलेल्या काही जुन्या वस्तू, दगडी अवशेष आदींच्या नोंदणी करुन, सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. कुंड पूर्ववत झाल्यानंतर सापडलेल्या या वस्तू सुद्धा नागरिकांना पाहण्यासाठी खुला करणार असल्याचे महेश जाधव यांनी यावेळी सांगितले.

मंदिराच्या जागेची शासकीय मोजणी केली असता यामध्ये कुंडाच्या पश्चिमेस असलेल्या माऊली लॉज इमारतीच्या जिन्याचे अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले आहे. या जागेवरील 18 झाडे महानगरपालिका प्राधिकरणाच्या परवानगीने काढण्यात आलेली आहेत. इतर हार विक्रेत्यांची दुकानेही हलविण्यात आली आहेत. वारंवार विनंती करूनही संबंधित लॉज मालकाने न्यायालयातून स्थगिती घेतली आहे. वास्तविक या लॉज संदर्भात महानगरपालिकेकडेही कसलाही अधिकृत परवाना नाही. त्यामुळे हे अतिक्रमण असताना महापालिका प्रशासनाकडून कसलीच कारवाई होत नाही. कुंडाचे खोदकाम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय सुरू असताना, बंदिस्तासाठी लावण्यात आलेले पडदे, संबंधित लॉजकडुन काढण्यात आले. तसेच या खोदकामाचे चित्रीकरणही व्हायरल करण्यात आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार करण्यात आली आली. जर संबंधित लॉज मालकाने अशीच आडमुठेपणाची भूमिका घेतली तर जनताच करसेवा करेल‌ असा इशाराही महेश जाधव यांनी यावेळी दिला.

मंदिराचे होणार थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट

हेमाडपंथी बांधकाम शैली असलेल्या या प्राचीन करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिराच्या बांधकामाचे गुण शोधण्यासाठी लवकरच, या मंदिराचे थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. ज्यामुळे मंदिराचा पाया, बांधकामाची वैशिष्ट्ये तसेच गुण बाबी समोर येतील अशी माहिती सुद्धा महेश जाधव यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या