कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, राधानगरी धरणाचे 4 पैकी 2 स्वयंचलित दरवाजे बंद झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून राधानगरी धरणाचे चारपैकी दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. जिल्ह्यातील इतर धरणांचाही विसर्ग कमी असल्याने पुन्हा एकदा महापुराच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी अजूनही पंचगंगा नदी ही इशारा पातळीवरुन एक फुट अधिक 40.1 फुटांवर आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता यामध्ये अर्ध्या फुटांची वाढ होऊन,पंचगंगेची वाटचाल धोकापातळीच्या दिशेने सुरूच होती. या नदीची धोकापातळी 43 फुटांची आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या वृत्तानुसार जिल्ह्यातील 88 बंधारे पाण्याखाली गेले होते.

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 108.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.तर हातकणंगले-8.38,शिरोळ-6,पन्हाळा-50.71,शाहूवाडी-52.50,राधानगरी-49.83,करवीर-43.64,कागल-28.71,गडहिंग्लज-17,भुदरगड-48.40,आजरा – 42.75 आणि चंदगड-46.33 मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणात 233.24 दलघमी (98)टक्के पाणीसाठा आहे. या धरणाचे तिसऱ्या आणि सहाव्या क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सध्या या धरणाचे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे दरवाजे उघडलेले आहेत. राधानगरी धरणातून 4 हजार 256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. कोयना धरणात 92.28 टीएमसी पाणीसाठा असून कोयना धरणातून 55 हजार 958 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.अलमट्टी धरणात 102.412 टीएमसी पाणीसाठा असून, 2 लाख 50 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दरम्यान जिल्ह्यातील जांबरे,जंगमहट्टी व पाटगाव हे मध्यम प्रकल्प आणि कोदे लपा हा लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.तर तुळशी (95),वारणा (92),दूधगंगा (93),कासारी (85),कडवी (100),कुंभी (90),चिकोत्रा (87), चित्री (100),घटप्रभा (100) टक्के अशी धरणे भरली आहेत.