कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! 21 डिसेंबरला आरक्षण सोडत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखेर कोल्हापूर महापालिकेच्या सन २०२१ ते २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज बिगुल वाजला. तब्बल ८१ प्रभागासाठी येत्या २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याच दिवशी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडाही प्रसिद्ध करण्यात येणार असून २३ डिसेंबर २०२० ते ४ जानेवारी २०२१ पर्यंत त्यावर हरकती व सूचनांसाठी वेळ देण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून आज जाहिर करण्यात आली. उपायुक्त निखिल मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

यापूर्वीच्या महानगरपालिका सभागृहाची मुदत गेल्या महिन्यात १५ नोव्हेंबर रोजी संपली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यामार्फत सुरू आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत आणि निवडणूक कधी होणार याकडे सर्व इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या.

जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात महानगरपालिकेला प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ८१ प्रभागाचा प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर केला आहे. तसेच सन २००५, २०१०, आणि २०१५ मधील महापालिका निवडणुकीतील आरक्षणाचा अहवालही देण्यात आला आहे.

इच्छुकांची घालमेल

दरम्यान, ८१ प्रभागातील कोणकोणत्या प्रभागावर कोणते आरक्षण असणार याबाबत कमालीची उत्सुकता असून त्यानुसारच उमेदवार ठरणार आहेत. या निवडणुकीसाठी आतापर्यंत तयारी करत असलेल्यांची घालमेल वाढली आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर सध्या महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप, ताराराणी आघाडी तसेच छोटे पक्ष आणि अपक्षांच्या रणनितीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.