कोल्हापूर – जागेच्या वादातून खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा

बेले, ता. करवीर येथे जागेच्या वादातून धनाजी सदाशिव कारंडे (32) या तरुणाचा डोक्यात बांबू मारून खून केल्या प्रकरणी विजय दिनकर कारंडे (40) व राजेंद्र कारंडे (37) या दोघा भावांना जन्मठेपेसह 20 हजार रुपये दंडाची शिक्षा आज न्यायालयाने ठोठावली आहे. घराच्या बांधकामासाठी आणलेला चिरा दगड रिकाम्या जागी ठेवण्यावरुन 28 फेब्रुवारी 2018 रोजी धनाजी कारंडे व नामदेव कारंडे यांच्याशी वाद घालून विजय कारंडे, राजेंद्र कारंडे व दिनकर कारंडे यांनी बेदम मारहाण केली.

विजय कारंडे याने बांबुने मारहाण केल्याने धनाजी कारंडेसह नामदेव कारंडे व सखुबाई कारंडे यानाही उपचारासाठी सी.पी.आर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान धनाजी कारंडे याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नामदेव कारंडे याने इस्पुर्ली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार विजय कारंडे, राजेंद्र कारंडे व दिनकर कारंडे या तिघांच्यावर खून व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एम.के.जाधव यांच्या न्यायालयामध्ये पूर्ण झाली. सरकारी पक्षाच्या वतीने 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व विशेष सहाय्यक सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली.

आपली प्रतिक्रिया द्या