
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ आणि हेमाडपंथी स्थापत्यशास्त्र्ााचा अद्भुत नमुना असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज किरणोत्सवाच्या पूर्वसंध्येला मावळत्या सूर्याची किरणे देवीच्या खांद्यांपर्यंत पोहोचून लुप्त झाली. उद्या (दि. 9) पहिल्या दिवशी सूर्यकिरणे मुखापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
श्री अंबाबाई मंदिरात होणारा किरणोत्सव सोहळा वर्षातून दोन वेळा उत्तरायणमध्ये 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी, तर दक्षिणायनात 9, 10 आणि 11 नोव्हेंबरला होतो.
किरणोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास महाद्वारातून सूर्याची मावळती किरणे गरुड मंडपात आली. 5 वाजून 30 मिनिटांनी पितळी उंबऱयापर्यंत पोहोचली. 5 वाजून 42 मिनिटांनी किरणांनी देवीला चरणस्पर्श केला. 5 वाजून 46 मिनिटांनी ही किरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली. 5 वाजून 47 मिनिटांनी सूर्याची किरणे देवीच्या खांद्यांपर्यंत येऊन लुप्त झाली, अशी माहिती देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.



























































