ऐन दिवाळीत सर्व्हर डाऊनमुळे रेशन धान्यवाटपाचा बोजवारा, ‘आनंदाचा शिधा’चा पत्ताच नाही; धान्य दुकानदाराला मारहाण

यंदाही दीपावलीचा ‘आनंदाचा शिधा’ मिळत नसल्याने रेशन धान्य दुकानात दररोज वादावादीचे प्रकार घडत असताना आता सर्व्हर डाऊनमुळे जिल्ह्यातील 1 हजार 500हून अधिक रास्त भाव धान्य दुकानांतील वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. सततच्या या प्रकारामुळे धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांकडून मारहाणीचे प्रकार घडत आहेत. राधानगरी तालुक्यात एका दुकानदाराला जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 570 रेशन धान्य दुकानांची संख्या असून, लाभार्थी प्राधान्य कुटुंबांची संख्या 5 लाख 80 हजार आहे. यंदा गणेशोत्सवानंतर आता दिवाळीतही राज्य शासनाचा ‘आनंदाचा शिधा’ आलेला नाही. त्यात सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने रास्त भाव धान्य दुकानदार आणि लाभार्थी यांच्यात दररोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत. राधानगरी तालुक्यातील आकनूर विकास सोसायटीचे मॅनेजर अरविंद पाटील यांनी रवींद्र पाटील या कार्डधारकास सर्व्हरच्या समस्येमुळे धान्य दिले नाही. त्यामुळे रवींद्र पाटील यांनी अरविंद पाटील यांना बेदम मारहाण केली. पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यासाठी विलंब होत असल्याने रेशन धान्य दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

शासनान पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी – रवि मोरे

सर्व्हर डाऊनमुळे 70 टक्के वितरण अद्यापि होऊ शकलेले नाही. मारहाणीचे असे प्रकार घडू नये यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांतील मोफत धान्यवाटपाचे कमिशन 8 कोटी रुपये लवकर द्यावे, अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हापुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे केली. यावेळी श्रीपत पाटील, आनंदा लादे, अबू बारगीर, सरिता हरगुले, इंदुमती मिरजकर आदी उपस्थित होते.