बाजारपेठेत बॅरिकेट लावून अडवणूक करू नका, शिवसेनेचे करवीर पोलिसांना निवेदन

ऐन दिवाळीत बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या असताना, मध्यभागी बॅरिकेट लावून वाहनांची अडवणूक होत असल्याने त्याचा व्यापारावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाजारपेठेच्या मध्यभागीच बॅरिकेट लावून ग्राहकांना मज्जाव करणे, व्यापारी वर्गावर अन्यायकारक आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये, याची दक्षता घ्या, अशी मागणी करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली आहे.

करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नावे गांधीनगरचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, असे आश्वासन तनपुरे यांनी शिष्टमंडळाला दिले.