
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांवरून दररोज टीका आणि आंदोलन होत असल्याने अखेर रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि वाया गेलेला कोटय़वधींचा निधी पाहण्यासाठी काल (दि. 15) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी अचानक पाहणी केली. यावेळी शासन व महापालिकेच्या निधीतून मंजूर कामे दिलेल्या मुदतीत न केल्याने तसेच काही ठिकाणची कामे दर्जेदार नसल्याने शहर अभियंता रमेश मस्कर व उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी शासनाच्या व महापालिकेच्या स्वनिधीमधून मंजूर असलेली कामे तत्काळ गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. शहरातील रस्त्यांसाठी 2 कोटींचा निधी मंजूर केला असून, दिलेल्या मुदतीत निधी मंजूर करूनही कामे पूर्ण केली नसल्याने ही कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.या ठिकाणी पुढील दोन आठवडय़ांत पुन्हा पाहणी करून सर्व कामांची गुणवत्ता व रस्त्यांची तपासणी करणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.यामध्ये दिरंगाई झाल्यास उपशहर अभियंता यांच्यावर सक्त कारवाई करणार असल्याचे सांगितले.
ठेकेदारावरही कारवाई; नोटीस बजावली
या रस्त्यांच्या पाहणीदरम्यान प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी महापालिकेच्या निधीमधून 1 कोटी चारही विभागीय कार्यालयांना पहिल्या टप्प्यात पॅचवर्कच्या कामासाठी दिले होते. यामध्ये फक्त बेसवर्कची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सिल्कोट मारण्यात आले असल्याचे आढळून आले. यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखीन 1 कोटी मंजूर केले असूनही ती सुरू न केल्यामुळे तसेच कामाचा दर्जा ढासळल्याने प्रशासकांनी उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार यांना त्यांची वार्षिक वेतनवाढ का थांबवू नये, उपशहर अभियंता यांचा पदाचा अतिरिक्त कार्यभार का काढून घेऊ नये, याबाबत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांनी मंजूर कामे मुदतीत सुरू न केल्याने त्यालाही नोटीस बजाविण्यात आली आहे.