
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा नद्या-नाल्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेचे पाणी पाचव्यांदा पात्राबाहेर पडल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने मंगळवारी पावसाचा जोर कमी राहिल्याने राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे दुपारपर्यंत बंद झाले. सायंकाळपर्यंत केवळ एकच दरवाजा उघडला होता, तर 32 बंधारे पाण्याखाली गेले होते. दरम्यान, पंचगंगा नदीची पाणीपातळी सकाळी सात वाजता 32 फूट 6 इंच झाली होती. दुपारी तीन वाजता 6 इंचांची घट झाली होती.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप मंगळवारी दिवसभर कमी झाली. शहरासह धरण पाणलोटक्षेत्रातही पावसाचा जोर कमी राहिला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत दिवसभरात घट झाली असली, तरी नद्यांचे पाणी पात्राबाहेरच राहिले. सोमवारी सायंकाळी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले होते. आज दुपारपर्यंत यातील तीन दरवाजे बंद झाले, तर 3 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा सायंकाळी उशिरापर्यंत उघडा होता. धरणातून विसर्ग कमी प्रमाणात असल्याने पंचगंगेची पाणीपातळी एक-दोन तासांनी इंचाइंचाने कमी होत होती.
धरणे फुल्ल; वर्षभर पाण्याची चिंता मिटली
गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे जिह्यातील सर्वच धरणे आणि लघु व मध्यम प्रकल्प ‘फुल्ल’ झाले आहेत. आज सकाळच्या नोंदीनुसार, राधानगरी 99, वारणा 99.86, दूधगंगा 99, कासारी 98, कुंभी 99 आणि आंबेहोळ 88 टक्के भरले असून, तुळशी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, कोदे ल.पा. हे लघु, मध्यम व मोठे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. जिह्यातील सर्व धरणे आणि लघु व मध्यम प्रकल्प पुन्हा एकदा ‘फुल्ल’ झाल्याने जिह्याचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

























































