कोल्हापुरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.04 टक्के, राज्यात जिल्हा अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरानाविरुद्ध लढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कोरोना केंद्र, आरोग्य केंद्रे व रूग्णालये शासकीय व खासगी सहकार्यातून सुरू केल्याने, रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आली. यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी, नागरिकांनी सहकार्य केल्याने, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

संशयित रुग्णांच्या तत्काळ तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक RT-PCR आणि CB-NAAT मशिन सर्व प्रथम उपलब्ध केले. मंगळवारी 3 लाख 26 हजार 773 स्वॅब तपासणी होऊन, त्यातील 49 हजार 857 पॉझीटिव्ह पैकी 48 हजार 76 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांचे 96.04 टक्के इतके रिकव्हरीचे प्रमाण असून, राज्यात जिल्हा अव्वल स्थानावर राहिला. तसेच 15 हजार 500 इतक्या रेमडीसीवीर इंजेक्शनचे मोफत वाटप करणारा राज्यात कोल्हापूर हा एकमेव जिल्हा असल्याचेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. जिल्हयात 10 हजार किटचे वाटप करुन गंभीर आजारी नसलेल्या रुग्णांना घरीच उपचार दिले.

सीपीआर, आयजीएम-इचलकरंजी, गडहिंग्लज रुग्णालयात Central liquid oxygen system विक्रमी वेळेत बसविण्यात आले. सर्व कोविड केअर केंद्राना औषधी, साधनसामुग्री पुरवठा करून प्रभावी उपचार केले. जिल्ह्यातील 50 वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्याधीग्रस्त लोकांना आयुष अंतर्गत सर्वेक्षण करुन प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अंशमनी वटी व अर्सेनिक अल्बम-30 हे औषध वाटप करून, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोव्हिड बाधित रूग्णांवर उपचारासाठी युद्धपातळीवर 53 कोविड काळजी केंद्रे, 12 समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रे व 5 समर्पित कोविड रूग्णालयांची उभारणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक कोवीशिल्ड

लसीकरणाच्या पहिल्या टप्यातील मोहिमेत जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 598 जणांना लस देण्यात आली आहे.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाने भर दिला असून, नुकत्याच 39 अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.