छत्रपती राजाराम तलाव बचावासाठी कोल्हापूरकर आक्रमक, शिवसेनेसह पर्यावरणप्रेमी, जलतरण मंडळाची पाण्यात उतरून निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी कोल्हापुरातील राजाराम तलावाच्या पाणलोट क्षेत्राचा वापर करण्यास कोल्हापूरकरांचा तीक्र विरोध आहे. या संदर्भात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह पर्यावरणप्रेमी तसेच जलतरण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले. राजाराम तलावात उतरून कार्यकर्त्यांनी ‘राजाराम तलाव बचाव’चा नारा दिला.

दरम्यान, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर राजाराम तलावाऐवजी शिवाजी विद्यापीठात करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांनी यावेळी केली. पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारीत असणारा शहरातील छत्रपती राजाराम तलाव हा पाणलोट क्षेत्र व स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य असणारा असून, शहरातील सौंदर्यात भर टाकणारा आहे. सामाजिक संस्थांकडून दरवर्षी जलदिनानिमित्त येथे मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. तलावातील पाणी स्वच्छ राहावे, यासाठी अनेक संस्थांनी प्रयत्न केले आहेत.

छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने असणारे राजाराम हायस्कूल बंद करण्याचा पालकमंत्री दीपक केसरकर यांचा प्रयत्न कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने हाणून पाडला. आता छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने असणाऱया तलाव परिसरात इमारती उभ्या करून महाराष्ट्र शासन काय साध्य करणार आहे? असा प्रश्न कोल्हापूरच्या जनतेला पडला आहे. जिह्यात शासनाच्या अनेक रिकाम्या जागा आहेत. मग छत्रपती राजाराम तलावावरच कन्व्हेंशन सेंटर का उभे केले जात आहे? असा सवाल करत आज सकाळी राजाराम तलावात उतरून, शिवसेनेसह पर्यावरणप्रेमी, राजाराम तलाव जलतरण मंडळ यांनी एकत्र येवून ‘छत्रपती राजाराम तलाव वाचवा’ अशी निदर्शने केली.

यावेळी राजाराम तलाव जलतरण मंडळाचे अध्यक्ष उदय यवलुजे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, राजू यादव, पोपट दांगट, विराज पाटील, विशाल देवकुळे, महेश उत्तुरे, कमलाकर जगदाळे, रघुनाथ टिपुगडे, राजू पाटील, उचगावचे माजी सरपंच कावजी कदम, रामा पसारे, प्रवीण शहा, दलीम गायकवाड, सुनील पाटील, प्रकाश गणाचारी, रणजीत यादव, संदीप पाटील, अनिल धनवडे, प्रकाश पोवार, सुरेश मुसळे, किरण पाटील, उत्तम मोरे, मोहन पाटकर, अमित खुडे, दिलीप पोवार, शिवाजी प्रभू आदी उपस्थित होते

राजाराम तलावाचा वापर करण्यास विरोध

महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे मंडळाकडे असणाऱया छत्रपती राजाराम तलावाच्या वापराच्या अटी व शर्तींचा विचार करावा. राजाराम तलाव, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव कोल्हापूरची अस्मिता आहे. आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरसाठी राजाराम तलावाच्या पाणलोट क्षेत्राचा वापर करण्यास कोल्हापूरकरांचा विरोध राहील, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांनी केले आह़े