दिलासादायक! कोरोना रूग्णांवर कोल्हापुरात यशस्वी प्लाझ्मा थेरेपी

734

छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे. कोल्हापूर जिल्हयाच्या दृष्टीने हा पहिलाच प्रयोग दिलासादायक असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री उशिरा दिली.

कोरोनामुक्त झालेल्या रूग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यासाठी सीपीआर रुग्णालयास राज्यातील सर्वात अत्याधुनिक असलेलं प्लाझ्मा अफरेशिस मशिन प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यामुळे कोरोनामुक्त रूग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेणे शक्य झाले असून गंभीर, अत्यवस्थ कोरोना रूग्णांवर या प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्याची सोय कोल्हापुरात उपलब्ध झाली आहे.

पुण्याहून आलेला आणि जिल्ह्यात सापडलेला पहिला कोरोना रूग्ण 18 एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला.त्या कोरोनामुक्त युवकाच्या मान्यतेने त्याच्या रक्तातील 550 मिली प्लाझ्मा घेण्यात आला होता.कोरोना बाधित गंभीर, अत्यवस्थ रूग्णावर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी उपयोगी ठरला आहे. हा प्लाझ्मा सीपीआरमधील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास देण्यात आला.त्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधित कोरोना रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला असता, तो निगेटिव्ह आला आहे. तसेच तो रुग्ण आरोग्याच्यादृष्टीने अतिशय चांगला असल्याचे सीपीआरचे हिमॅटोलॉजिस्ट डॉ.वरूण बाफना यांनी सांगितले. जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब असल्याने, यापुढेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्लाझ्मा दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या