
मराठवाडय़ात कोसळलेल्या अस्मानी संकटातील पूरग्रस्तांसाठी सोमवारी दुपारी कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून 27 टेम्पो भरून मदत रवाना करण्यात आली. तसेच पुढील टप्प्यात पूरग्रस्त भागात शालेय साहित्याची मदत पाठवणार असल्याचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत मदतीचे टेम्पो रवाना करण्यात आले.
धान्यासह किराणा सामान, प्रथमोपचार साहित्य, सॅनिटरी पॅड्स, चप्पल, पाणी बॉटल्स, कपडय़ांपासून ते ब्लँकेट्स, चटईपर्यंत कोल्हापुरातील प्रत्येकाने यात खारीचा वाटा उचलला. यातून तब्बल 27 टेम्पो भरून मदत गोळा झाली. ही मदत धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर आणि सोलापूर या जिह्यांमध्ये प्रत्येकी पाच टेम्पो पाठवण्यात आले. आमदार सतेज पाटील यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर चंदगडपासून ते शाहूवाडीपर्यंतच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.