कोल्हापूर – सादळे-मादळे, पन्हाळा परिसरात बिबट्यांचा संचार, वनविभागाने लावले पिंजरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करवीर तालुक्यातील सादळे-मादळे परिसरात गेल्या चार दिवसांपासून चार पट्टेरी वाघ फिरत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले असतानाच पुन्हा याच परिसरात एका बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. वन विभागाकडुन परिसरात पिंजरे लावले आहेत, मात्र या सापळ्यात अजुनही बिबट्या सापडला नाही.

सादळे-मादळे परिसरात तीन दिवसांपूर्वी एका हाॅटेल समोरील रस्त्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या बसल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. यानंतर चार बिबटे या परिसरात पाहिल्याची चर्चा होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली. पण काही प्रत्यक्षदर्शीकडुन एकाच बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर वन विभागा कडुन सादळे-मादळे परिसरात घाट सुरु होणा-या ठिकाणी सापळा लावण्यात आला आहे. आता आणखी तीन सापळे लावण्यात येणार असल्याचे वन्यप्राणी बचाव पथकाचे प्रदिप सुतार यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना सांगितले.

मुख्य वन संरक्षक डॉ.क्लेमेंट बेन उपवन संरक्षक काळे, सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय पाटील, वनरक्षक हजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळवेकर यांच्यासह वन्यजीव बचाव पथक जागेवर तैनात केले आहेत.

पन्हाळा परिसरात चार ते पाच बिबट्यांचा वावर आहे. गेल्या एक-दोन आठवड्यापुर्वी पन्हाळा किल्ला व परिसरात ढगफुटीने हे बिबटे बाहेर पडले असावे. यापैकी काही शाहुवाडी परिसरात गेले आहेत. तर या बिबट्यांची अजुन पुर्णवाढ झाली नसली तरी आपल्या परिसरात अन्य कोण नको यासाठी मोठ्या बिबट्यांकडुन अशा लहान बिबट्यांना बाहेर काढले जात असल्याची माहिती वन विभागाकडुन मिळाली.