
कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला संततधार पाऊस आजही सुरूच राहिला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील 58 बंधारे अद्यापि पाण्याखाली गेले आहेत, तर पंचगंगा नदीची पाणीपातळी 33.4 फुटांवर स्थिरावली आहे. कालपासून पात्राबाहेर पडलेल्या नद्यांचे पाणी लगतच्या शेतातही पसरू लागले आहे. कालच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरीही संततधार पाऊस सुरूच होता. त्यामुळे कोयना, उरमोडी धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा कास तलाव यंदा पहिल्या पावसातच ओव्हरफ्लो झाल्याने शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असून, कृष्णा आणि वारणा नद्यांची वाढलेली पाणीपातळी सायंकाळपासून कमी होत असल्याने नदीकाठच्या गावांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कृष्णेच्या पाणीपातळीत संध्याकाळी पाच फुटांनी घट झाली, तर वारणेची पाणीपातळी स्थिर होती. दरम्यान, नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच आहे.
पंचगंगेची पातळी 33.4 फुटांवर स्थिरावली
कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर अजूनही कायम असून, कालपासून पात्राबाहेर पडलेल्या नद्यांचे पाणी लगतच्या शेतांतही पसरू लागले आहे. सायंकाळपर्यंत पंचगंगा नदी 33.4 फुटांवर स्थिर होती. 58 बंधारे अजूनही पाण्याखाली असून, येथील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. दिवसभर काहीशी विश्रांती घेत अधूनमधून मुसळधार पावसाचा जोर आजही सुरूच राहिला. राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग सुरू होता.
गेल्या 24 तासांत सकाळी 8 वाजेच्या नोंदीनुसार शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर हातकणंगलेत 16.3, शिरोळ 36.6, पन्हाळा 33.9, राधानगरी 62.7, गगनबावडा 68.8, करवीर 29.5, कागल 46.7, गडहिंग्लज 33, भुदरगड 56, आजरा 61.6 आणि चंदगड तालुक्यात 75.4 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली.
झाड पडून आजी आणि नातवाचा मृत्यू
गडहिंग्लज – गेले दोन दिवस तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. मुलीकडे आलेल्या आजी आणि त्यांना त्यांच्या सोडण्यासाठी निघालेल्या नातवावर काळाने घाला घातला. गडहिंग्लज-आजरा रस्त्यावर झाड कोसळल्याने दुचाकीवरून जाणाऱया सतीश जोतिबा शिंदे (वय 36, रा. अत्याळ, ता. गडहिंग्लज) व सोनाबाई पांडुरंग जाधव (वय 75, रा. लिंगनूर, ता. गडहिंग्लज) यांचा मृत्यू झाला.
सांगलीत कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत घट
सांगली – जिल्ह्यात तब्बल तीन दिवस धो-धो कोसळणाऱया पावसाचा जोर शुक्रवारी काहीसा कमी झाला. कृष्णा आणि वारणा नद्यांची वाढलेली पाणीपातळी सायंकाळपासून कमी होत असल्याने नदीकाठच्या गावांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कृष्णेच्या पाणीपातळीत संध्याकाळी पाच फुटांनी घट झाली, तर वारणेची पाणीपातळी स्थिर होती. कृष्णा आणि वारणा नद्यांवरील 10 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोयना आणि चांदोली धरण पाणलोटक्षेत्रात पावसाची संततधार सुरू होती. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज तालुक्यांत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. उर्वरित तालुक्यांतही काही ठिकाणी पाऊस झाला.
मागील तीन दिवस जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सांगली शहरासह वाळवा आणि शिराळा तालुक्यांत अतिवृष्टी, तर अन्यत्र संततधार सुरू राहिल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी 25 फुटांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. तसेच प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत संध्याकाळी पाच फुटांनी कमी झाली.
जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. कृष्णा नदीवरील नागठाणे, बहे व म्हैसाळ तीन दिवसांपासून पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीवरील मांगले-सावर्डे, दूधगाव, चिंचोली आणि तांदूळवाडीचे बंधारे गुरुवारी पाण्याखाली गेले होते. चावरे, शिगाव आणि दानोळी हे तीन बंधारेही शुक्रवारी पाण्याखाली गेले. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीवरील 10 बंधारे पाण्याखाली गेले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
कोयना, उरमोडी धरणांमधून अल्प विसर्ग सुरू
सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार कायमच आहे; पण कालच्या तुलनेत जोर काहीसा कमी झाला आहे. कालच्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात रस्ते, पूल यांसारख्या सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याच वेळी जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहाने शेतीची मोठय़ा प्रमाणात धूप झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या प्रारंभीच धरणांना मोठा ‘जललाभ’ झाल्याने कोयना, उरमोडी धरणांमधून अल्प का असेना, विसर्ग सुरू झाला आहे.
सातारा, कराड, पाटण, जावळी, तसेच महाबळेश्वर तालुक्यांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे. पाटण तालुक्यातील केरा नदीच्या खोऱयात ढगफुटीसारखा तुफान पाऊस झाल्याने नदीकाठाने महापुराचा ट्रेलर अनुभवला. त्याचप्रमाणे या तालुक्यातील ढेबेवाडी, तारळे, चाफळ खोऱयांमध्येही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. या पावसाने चाफळवरून दाढोलीमार्गे सडावाघापूर-पाटण मार्गावरील दाढोली घाटातील रस्ता मोठय़ा प्रमाणात खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी
केले आहे.
कोयनेच्या विद्युतगृहातून 2100 क्युसेकचा विसर्ग
कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात 24 तासांत कोयनानगरला 142, नवजाला 122 व महाबळेश्वरला 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद 49 हजार 604 क्युसेक पाण्याची आवक होत असून, आज सकाळी धरणपायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा 35.13 टीएमसीपर्यंत गेला आहे. पाणीसाठय़ात 24 तासांत साडेतीन टीएमसीची वाढ झाली आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव ओव्हर फ्लो झाल्याने हे पाणी उरमोडी धरणात येऊ लागले आहे. उरमोडीतील पाण्याची आवक वाढल्याने आज धरणाचे चारही वक्र दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून, धरणातून 1986 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाच्या सरीवर सरी
नगर – भंडारदरा पाणलोटात पाऊस पुन्हा कोसळू लागल्याने शेतकऱयांना हायसे वाटले आहे. पाऊस कोसळत असला, तरी फारसा जोर नाही. दरम्यान, अधूनमधून पडणाऱया पावसामुळे डोंगरदऱया हिरव्यागार दिसू लागल्या आहेत.
भंडारदरा, घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत काल गुरुवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता भंडारदरा परिसरात 9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी या धरणातील पाणीसाठा पाच हजार 227 दलघफू होता. विद्युतगृह क्रमांक 1मधून 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, मुळा नदीही 450 क्युसेकने वाहती झाली असून, 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. हे धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर असून, पाणलोटातील पाऊस वाढल्यास कोतूळचा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.



























































