
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला. त्यानंतर महिनाभरातच दुसऱया महापुराची स्थिती ओढवली होती. यापाठोपाठ आता नोव्हेंबर महिन्यातही जिल्ह्यात रोजच अतिवृष्टी होत आहे. शिवाय आणखी काही दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील साखर आणि गुळाचा हंगाम धोक्यात आला आहे.
जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टरपैकी 62 हजार हेक्टरवरील ऊस पूर आणि अतिवृष्टीने बाधित झाला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन 80 लाख टनानी घटण्याची शक्यता आहे. परिणामी, एरवी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणारा साखरेचा गळीत हंगाम अद्यापि सुरू झालेला नाही. सध्याचे पावसाचे वातावरण पाहता यंदाचा गळीत हंगाम या महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपलब्धता कमी असल्यामुळे उसाच्या पळवापळवीसाठी यंदाचा हंगाम गाजण्याची शक्यता आहे. यंदाचा महापूर, अतिवृष्टी, सततचा आणि परतीचा पाऊस यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारची शेती संकटात सापडली आहे. यातून अन्नधान्याचा तुटवडा होण्याची चिन्हे आहेत.
भाजीपाल्यापासून ते कडधान्याच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याने महागाईची प्रचंड झळ बसू लागली आहे. अशातच यंदाचा साखर आणि गूळ हंगाम प्रचंड धोक्यात आला आहे. साखर उत्पादनात नेहमीच आघाडीवर असलेल्या एकटय़ा कोल्हापूर जिल्ह्यातच नदीकाठच्या आणि पूरबाधित क्षेत्रातील तब्बल 62 हजार 570 हेक्टर क्षेत्रावरील ऊसपीक कुजून गेले आहे. उसाची वाढ खुंटून पेरातून फुटवे फुटले असून बहुतांश ठिकाणी उसाचा वापर चाऱयासाठी करण्यात येत आहे. जिल्ह्यात महापूरबाधित क्षेत्रात 50 टक्के आणि अतिवृष्टीमुळे आणखी 20 ते 25 टक्के उसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात उसाचे उत्पादन सुमारे 80 लाख टनाने घटण्याची प्राथमिक शक्यता आहे.























































