भुदरगडमध्ये टस्करच्या धुमाकुळीमुळे पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजरा तालुक्यातून भुदरगडच्या डेळे मेघोली वनहद्दीत चार दिवसांपूर्वी दाखल झालेला हत्ती शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोंडूशी, अंतुर्ली गावातून प्रवास करत शिवडाव येथील रेडेओहळ जंगलात दाखल झाला आहे. येथील परिसरात टस्कर हत्तीने धुमाकूळ घालत पिकांची मोठी नासधूस केली आहे. त्यामुळे वन विभागाने त्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाच दिवसांपूर्वी हत्तीने डेळे-भारमलवाडी जंगलात विश्रांती घेतली होती. त्यानंतर त्याने भारमलवाडी जंगलाची हद्दपार करून उकिरभाटले, चापेवाडी या जंगलातून पाळ्याचाहुडा व अनफ खुर्द या गावांतून तांबाळे महावितरण कार्यालयाच्या दारातून कोंडुशी वनहद्दीत प्रवेश केला होता. त्यानंतर बुधवारी अंतुर्लीच्या जंगलातून अथणी शुगर्स कारखान्याच्या स्थळावर दाखल झाला होता. तेथील तारेचे कुंपण तोडून शिवडावच्या जंगलात गुरुवारी पहाटे तो दाखल झाला. जंगला शेजारी असलेल्या धनगरवाडय़ावरील हेमंत खरात यांच्या घरातील दरवाजा सोंडेने ढकलला. त्यामुळे घरातील लोक घाबरले होते. त्यानंतर प्रमोद मोरेकर यांच्या शेतातील उसाचे नुकसान करत जंगलाच्या दिशेने निघून गेला.

या परिसरात नेहमीच होत असलेल्या गव्यांच्या त्रासामुळे परिसरातील शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांची रखवाली करतात. त्यांना हा हत्ती दिसताच त्यांनी मोबाईलवरून हत्ती गावठाण येथील मराठी शाळेच्या जवळून जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे हत्तीला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

गतवर्षी हत्तीने याच मार्गाने कोंडुशी जंगलातून पुढे राधानगरी तालुक्यातील वकिघोल आणि पुढे गगनबावडापर्यंत मजल मारली होती. यावेळीदेखील हत्ती याच मार्गे पुढे जाण्याची शक्यता असल्याने भुदरगड, राधानगरीसह गगनबावडा वन विभागाने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. दरम्यान, हत्तीच्या मागावर वनरक्षक जॉन डिसोझा, वनमजूर तुकाराम लाड, मारुती गुरव, पकू तेजम, ग्रामस्थ प्रकाश तवटे, अनिल पाटील, सतीश थवी, संजय तोरस्कर लक्ष ठेवून आहेत. तर हत्तीचा वावर असणाऱया शेतात रात्रीच्या वेळी शेतकऱयांनी जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.