
मोदी सरकारने मंजुर केलेली तीन विधेयके जर शेतकरी हिताची आहेत.तर मग छातीठोकपणे पुढे यायला हवे होते.पण विरोधी पक्ष,मित्रपक्ष यांच्याशी कसलीही चर्चा न करता,आडमार्गाने राज्यसभेत बहुमत नसतानाही ती मंजुर केली गेली.त्यामुळे शेतकरी विरोधी हि काळी विधेयके मागे घेईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार आज काँग्रेसच्या ट्रॅक्टर रॅलीत घेण्यात आला.
काँग्रेसचे जेष्ठ नेते एच.के.पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, महापौर निलोफर आजरेकर, जि.परिषद अध्यक्ष बजरंग पाटील आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संसदेत कोणतीही चर्चा न करता,मोदी सरकार कडून एकतर्फी करण्यात आलेल्या शेतकरी विधेयका वरून सध्या देशात सर्वत्र विरोधाचे वातावरण तयार झाले आहे.काँग्रेस कडुन ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शविण्यात येत आहे.आज निर्माण चौक येथुन या रॅलीस सुरुवात झाली.तर ऐतिहासिक दसरा चौक येथे समारोप करण्यात आला. यावेळी सर्वच नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकुन टिका केली.
मोदींच्या खोटेपणाचे स्वरूप आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. घाईगडबडीत मंजूर केलेल्या या शेतकरी विधेयकावरून लक्ष विचलित करण्यासाठी 20 लाख कोटीचे पॅकेज पुढे आणले.पण यातील एक पैसाही शेतकऱ्यांना आजपर्यंत देण्यात आला नाही. मग हे वीस लाख कोटी गेले कुठे ?असा थेट सवाल करून,मोदी यांनी खोटे बोलणे बंद करावे.दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करणार म्हणुन सांगण्यात आले .पण दोन कोटी पेक्षा अधिक जणांचे रोजगार हिरावले गेले.त्यामुळे खोटं बोलण्याचे पॅकेज नको ,शांतीने जगू द्या असा टोला एच.के.पाटील यांनी मोदी यांना लगावला. शिवाय बिहार मध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या सभेतील मोकळ्या खुर्च्या म्हणजे त्यांच्यासाठी इशाराच असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर मोदी सरकारने केलेले शेतकरी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी असते तर मग मोदी सरकारने छातीठोकपणे पुढे यायला हवे होते. पण हे कायदे आपला गळा घोटणारा असल्याचे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे. इचलकरंजी मधील सूत व्यवसायिकांचा माल व्यापारी घेऊन जातात. नंतर दिवाळखोरी जाहीर करतात. त्याप्रमाणेच शेती व्यवसायातही असे प्रकार होतील अशी भीती व्यक्त करत,या कायद्याचे स्वरूप आणि दाखवायचे चित्र यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे,पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणले.
मोदींचा हम करे सो कायदा-पृथ्वीराज चव्हाण
लपून,आडमार्गाने,चोरी चुपे,राज्यसभेत बहुमत नसतानाही मोदी सरकारने हे शेतकरी विधेयक आणले.विरोधी पक्ष तसेच त्यांचे मित्र पक्षांशीही त्यांनी चर्चा केली नाही. संसदीय समितीकडे ही विषय सोपवला नाही. त्यामुळे मोदी यांचा हम करे सो कायदा आहे. एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अर्थव्यवस्थेचे नियंत्रण सुटले आहे.अनेक सरकारी कंपन्या विकायची पाळी आली आहे. आता मोदींची वक्रदृष्टी शेतीकडे असल्याची टीका ही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.शिवाय बिहारमध्ये नितीशकुमार यांनीबाजार समित्या बंद केल्या त्याचे परिणाम आता निवडणुकीत दिसून येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मोदी यांच्या केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.यापूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.पण त्यासाठी ६५ रकान भरायला लावले.पण कोरोना महामारी,लाॅकडाऊनमुळे राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असतानाही अतिवृष्टी आधी नैसर्गिक आपत्तीचा ही सामना करावा लागला अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांच्यासाठी महा विकास आघाडीच्या सरकारकडुन शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.तर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कामगार कायदेही या मोदी सरकारने बंद केल्याचे बाळासाहेब थोरात यांनी निदर्शनास आणले.
तर शेतकऱ्यांना हमीभाव,संरक्षण न देणारा हा कायदा हुकुमशाही पद्धतीने चर्चा न करता केला आहे.त्यामुळे शेतकरी विरोधी हा कायदा कधीही पास करून देणार नसल्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितले.






























































