कोल्हापूरच्या गिर्यारोहकांचे लिंगाणा सुळक्यावर यशस्वी आरोहण

कोविडमुळे गेल्या सात आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गडकोट मोहिमा पुन्हा सुरू झाल्या असून,  कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी गिर्यारोहणांसाठी आव्हान असणारा अत्यंत थरारक असा ‘लिंगाणा सुळका’ सर केला आहे.

स्वराज्याची राजधानी रायगड आणि स्वराज्याचे तोरण म्हणजेच तोरणागड यांच्यामध्ये 3100 फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा हा अति दुर्गम असा हा कातळकड्याचा गिरीदुर्ग लिंगाणा होय.

खंडेनवमी दिवशी गिर्यारोहण साहित्याचे पूजन करून, गिर्यारोहणाची सुरुवात करण्याची महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाची एक प्रथा आहे. पण यंदा कोविडमुळे मोहीम करण्यास उशीरच झाला. मार्च महिन्यात पदभ्रमंती आणि गिर्यारोहण बंद पडले होते.आता पुन्हा सुरुवात झाल्याने, दुर्गप्रेमींना उत्सुकता लागली होती. अनुभवी गिर्यारोहकांना लिंगाण्याची चढाई सोपी असली तरी नवीन गिर्यारोहकांना ही एक आव्हानात्मक मोहीमच आहे. यातून अनुभवी गिर्यारोहकांची उजळणी आणि नवीन गिर्यारोहकांना एक आव्हानात्मक मोहीम पूर्ण करण्याची संधी मिळण्याचे दोन उद्देश या मोहिमेत होते. लिंगाण्याची चढाई पायथ्यापासून शिखरापर्यंत साधारण अकराशे ते बाराशे फुटांची आहे. यामध्ये साधारण नऊ ते दहा वेगवेगळे अवघड टप्पे पार करावे लागतात. सराव आणि शारीरिक क्षमतेचा कस तपासून पाहण्यासाठी लिंगाणा चढाई हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

20 नोव्हेंबर रोजी 26 जणांची टीम मोहरी कडेमार्गस्थ झाली.लिंगाणा चढाई बरोबरच लिंगाण्या पर्यंत पोहोचणे हे देखील एक मोठे आव्हानच आहे.बोरट्याच्या नाळेतून (नाळ म्हणजे दोन डोंगरांमधील घळ) खाली उतरावे लागते. 50 अंशाच्या कोनात घाटमाथ्यावरून सरळ एक हजार फूट खाली उतरताना मोठे रॉक बोल्डर्स पार करावे लागतात. चालताना थोडी जरी चूक झाली तर सरळ दीड हजार फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता असते. साधारण दीड तासाची नाळेची उतरंड उतरून ओपन व्हॅलीत आल्यानंतर आकाशाला गवसणी घालणाऱ्या प्रचंड अशा लिंगाण्याचे उरात धडकी भरवणारे प्रथम दर्शन होते. येथे उजव्या हाताला रायलिंगच्या कड्या लगत असणाऱ्या अत्यंत छोट्याशा वाटेवरून लिंगाण्याकडे जाऊ लागतो. गिर्यारोहणाच्या भाषेत याला ट्र्यावर्स म्हणतात.

ही वाट देखील एवढी एक्सपोज आहे की काही ठिकाणी फिक्स दोराची मदत घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. उजवीकडे उंच कडा कसेबसे एक पाऊल पडेल इतपत छोटी वाट आणि डाव्या हाताला खोलीचा अंदाज न येणारी दरी. ही वाट आपल्याला रायलिंग पठाराचा कडा आणि लिंगाणा सुळका यांच्यामध्ये असलेल्या कोलमध्ये घेऊन जाते. इथूनच लिंगाण्याच्या खऱ्या चढाईची सुरुवात होते.

ही चढाई दोन टप्प्यात विभागली जाते.पहिला कोल मधून सुळक्याच्या पायथ्यापर्यंत आणि दुसरा सुळक्याचा पायथा ते माथा. पहिला टप्पा हा साधारण सहाशे फुटांचा असुन, यात चढाई करताना एकूण पाच टप्पे (ज्याला टेक्निकल भाषेत पीचेस म्हणतात) पार करावे लागतात. हार्नेस, कॅराबिनर, डीसेंडर,  सेल्फ अँकर हे सर्व गिर्यारोहण साहित्य वापरून सर्व टीम चढाईसाठी सज्ज झाली. प्रत्येक पिचला एक अनुभवी गिर्यारोहक चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांना बीले देण्यासाठी सेट केला होता. प्रत्येकाला टॉप बिले पद्धतीने सुरक्षा देऊन,  सर्वांनी मुक्त चढाई करत आरोहण करण्याचा बेत केला. ज्यामुळे नवीन गिर्यारोहकांना चढाईचा आनंद सुरक्षितपणे घेता येणार होता.

सकाळी सहा वाजता सुरू केलेली पायपीट संध्याकाळी सहा वाजता मुख्य सुळक्याच्या पायथ्याशी येऊन थांबली. चढाईच्या मार्गा जवळील गुहा खूपच छोटी होती. वीस जण त्यामध्ये कसेबसे समावले गेले. दुसऱ्या दिवशी चढाई लवकर सुरू करता येण्यासाठी गोपाळ,  धनंजय आणि अनिकेतने मुख्य सुळक्यावर रात्रीच जिथे पर्यंत शक्य आहे,  तिथपर्यंत रोप फिक्स करण्याचे ठरवले. अंधार होता होता त्यांनी मुख्य चढाईस सुरुवात केली. ही सातशे फुटांची चढाई पाच टप्प्यांमध्ये विभागली जाते. रात्री दहा वाजता तिसऱ्या टप्प्या पर्यंत दोर फिक्स करून तिघेही सुखरूप गुहेजवळ पोहोचले. रात्री महीबूबने बनवलेल्या पीठले आणि भातावर हात आडवा करून, काहीजण गुहेत आणि काहीजण चढाई मार्गाच्या पायथ्याला दोराला अँकर होऊनच झोपी गेले होते.

चढाईचा मुख्य दिवस, पहाटे चार वाजताच सगळे जण उठून तयारीला लागले. साधारण साडे पाचच्या सुमारास चढाईला सुरुवात झाली. पहिल्यांदा शेवटच्या दोन टप्प्याला राहिलेले रोप फिक्स करण्यासह मुख्य गिर्यारोहकांच्या टीमने चढाईस सुरुवात केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर गिर्यारोहकांनी आरोहनास सुरुवात केली. दिवस उजाडेल तसा चढाईच्या मार्गावरील एक्सपोजर चा अनुभव सर्वांना येऊ लागला. दोराच्या सहाय्याने कमरेला सुरक्षा दोर घेऊन लिंगाण्याच्या कड्यावर आरोहण करताना पायाखाली असणारी प्रचंड खोलीची दरी पाहतांना थरकाप उडत होता. इथून घसरलो तर काय होईल याची सर्वांनाच कल्पना होती. पण त्या भीतीवर मात करीत सुरक्षेच्या साहाने प्रत्येक जण माथ्याकडे सरकत होता.

सकाळी साडेदहाच्या सुमारास बारा वर्षाच्या कार्तिकने सर्वप्रथम लिंगाण्याचा माथा गाठला आणि त्यापाठोपाठ सर्व टीमने लिंगाण्या वर यशस्वी आरोहण केले. माथ्यावरुन पूर्वेला राजगड, तोरणा, पश्चिमेला साक्षात रायगड, जगदीश्वर मंदिर आणि राजांची समाधी अगदी स्पष्टपणे दृष्टिपथात येत होती. लिंगाण्यावरूनच राजांना मुजरा करून सर्व टीमने एकच जयघोष केला. चढाईला जेवढी काळजी घ्यावी लागते, त्यापेक्षा अधिक उतरताना सतर्क राहावे लागते. यशस्वी झाल्याचा आनंद व निष्काळजीपणा बाजूला ठेवून अत्यंत काळजीपूर्वक खाली उतरावे लागते.

विनायक कालेकर, अनिकेत जुगदार, मयूर लवटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यानंद बेडेकर, राहुल कदम, अभय मोरे, प्रदीप कवतीके, कार्तिक कवतिके, अथर्व कवतिके, मलय मुजावर, राणोजी पाटिल,  जयदीप जाधव, अजिंक्य गिरमल, स्नेहल रेळेकर, पंढरीनाथ जाधव, अवधूत पाटील, मनोज सातपुते, हर्षवर्धन साळोखे, प्रसाद आडनाईक, हर्षवर्धन चौगुले, मकरंद लवटे, स्वप्नील लवटे, कौस्तुभ लवटे, राजेश माने, नितेश सातार्डेकर, महेश भंडारे, अनिकेत महाजन, सतीश यादव यांनी सहभाग घेतला होता. जेष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज, प्रमोद पाटील, महिबूब मुजावर, ऋषीकेश केसकर यांनी या मोहिमेस मार्गदर्शन केले. समीट ऍडव्हेंचर, हिल रायडर्स अँड हायकर्स, मलय ऍडव्हेंचर, वेस्टर्न माउंटन स्पोर्ट्स, ऍडव्हेंचर गियर, व्हरटाईस ऍडव्हेंचर, कोल्हापूर मौंटेनीरींग अँड ऍडव्हेंचर फाउंडेशन या संस्थाचे सदस्य सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या