वरळी सी फेसवर शुक्रवारपासून कोळी महोत्सव

झणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय, बोंबील, सुरमई, पापलेट, गरमागरम भात अशा अस्सल चविष्ठ कोळी खाद्यपदार्थांची चव मुंबईकर खवय्यांना चाखता येणार आहे. युवासेनेच्यावतीने शुक्रवार, 24 ते रविवार, 26 नोव्हेंबरपर्यंत वरळी सी फेस येथील स्व. बिंदूमाधव ठाकरे चौकासमोर कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोळी बांधव म्हणजे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. मुंबईतील प्रत्येक कोळीवाडयात त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती जपलेली आहे. कोळी बांधवांची खाद्यसंस्कृती, त्यांचे मसाले आणि माशाची डिश बनवण्याची पद्धत आणि त्याची लज्जत हे त्याचे वैशिष्टय आहे. याच खाद्यसंस्कृतीची ओळख मुंबईकरांना व्हावी आणि ती टिकावी, या उद्देशाने दरवर्षी हा महोत्सव भरवण्यात येतो. महोत्सवाचे यंदाचे हे 9 वे वर्ष आहे. शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. संध्याकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत विविध स्टॉलवर असलेल्या कोळी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक आणि वरळी विधानसभेचे युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील आणि युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील यांनी केले आहे. वरळी सागरी कोळी महोत्सव समितीने याचे आयोजन केले आहे.