
आगामी काळात नेपाळविरुद्ध होणाऱया फुटबॉलच्या मैत्रीपूर्ण सामन्यापूर्वी हिंदुस्थानच्या पुरुष संघाचे राष्ट्रीय सराव शिबीर कोलकाता येथे सुरू झाले आहे. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कोलकाता येथे होत असलेल्या या शिबिरामध्ये खेळाडू कसून सराव करताना दिसले.
हिंदुस्थानने 2006 मध्ये फिफा विश्वचषक क्वालीफायरच्या दरम्यान सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोलकाता येथे सराव केला होता. 15 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा फुटबॉलचा संघ कोलकात्याच्या मैदानावर घाम गाळताना दिसला. याबाबत हिंदुस्थानचा मिडफिल्डर अनिरुद्ध थापा म्हणाला, राष्ट्रीय शिबिरामध्ये सहभागी होणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असून उपयुक्त ठरणारे आहे. आमचा संघ चीनमध्ये होणाऱया ‘एएफसी एशिया कप स्पर्धा 2023’ या स्पर्धेत पात्र होण्यासाठी तयारी करीत आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून बायोबबलमध्ये हा सराव सुरू आहे. सर्व खेळाडूंसह प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱयांनी कोलकातामध्ये दाखल होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केली आहे. तसेच शिबिरादरम्यान वेळोवेळी खेळाडूंसह इतरांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सेरीटन फर्नांडिस, आशीष राय, राहुल केपी आणि रहीम अली यांना पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी बोलवण्यात आले आहे. बंगळुरू एफसी आणि एटीके कोलकाता या दोन संघांकडून खेळणारे खेळाडू सध्या मालदीव येथे सराव करत आहेत. हा सराव संपल्यानंतर हे खेळाडू या राष्ट्रीय शिबिरात सहभागी होतील.
शिबिरामधील सहभागी खेळाडू
गोलकीपर : धीरज सिंग मोइरंगथेम, विशाल वैथ.
डिफेंडर : आशीष राय, सेरीटन फर्नांडिस, राहुल भेके, आदिल खान, चिंगलेनसाना सिंह, नरेंद्र, आकाश मिश्रा, मंदार राव देसाई.
मिडफिल्डर : बिपिन सिंग, ब्रॅण्डन फर्नांडिस, लालेंगमाविया, ग्लॅन मार्टिन्स, जॅकसन सिंग, प्रणय हलदर, अनिरुद्ध थापा, सहल अब्दुल समद, यासिर मोहम्मद, हलीचरण नारझारी.
फॉरवर्ड : राहुल केपी, फारुख चौधरी, ईशान पंडिता, रहीम अली.



























































