
आधीच स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या चेन्नईने गतविजेत्या कोलकात्याचा खेळ खराब करताना थरारक सामन्यात 2 चेंडू आणि 2 विकेटनी विजय मिळवला. चेन्नईच्या विजयामुळे कोलकात्यासाठी प्ले ऑफ प्रवेशात आणखी अडथळे आले असून आता त्यांना स्वतःच्या विजयासह दुसऱ्यांच्या पराभवाचीही वाट पाहावी लागणार आहे.
कोलकात्याच्या 180 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने आयुष म्हात्रे आणि डेव्हन कॉन्वे या दोघा सलामीवीरांना शून्यावरच टिपले. मग वंश बेदीच्या जागी आलेल्या उर्विल पटेलने 11 चेंडूंत 4 षटकार आणि 1 चौकार ठोकत 31 धावा केल्या. हर्षित राणाने ही जोडी पह्डली. रविचंद्रन अश्विनलाही त्यानेच बाद केले. वरुण चक्रवर्थीने रवींद्र जाडेजाची यष्टी वाकवून चेन्नईची 5 बाद 60 अशी अवस्था केली. मात्र त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि शिवम दुबेने 67 धावांची आक्रमक भागी रचत चेन्नईला विजयाजवळ नेले. वैभव अरोराने एकाच षटकात शिवम दुबे आणि नूर अहमदची विकेट काढून चेन्नईला दबावाखाली आणले, पण शेवटी फिनिशर महेंद्र सिंग धोनीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
चेन्नईसाठी हा मोसम अत्यंत वाईट गेला. मात्र आजच्या 12 व्या सामन्यात धोनीने कोलकात्याचे 12 वाजवले. कोलकात्याने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या 48 आणि मनीष पांडे (ना. 36) आइण आंद्रे रसल (38) यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या 46 धावांच्या भागीने कोलकात्याला 179 धावांपर्यंत पोहोचवले. नूर अहमदने आपल्या पहिल्याच षटकात 4 चेंडूंत सुनील नरीन (26) आणि अंगक्रिश रघुवंशी (1) यांच्या विकेट काढत कोलकात्याला अडचणीत आणले, मात्र रहाणेसह पांडे-रसलने कोलकात्याला सावरले. नूरने रसल आणि रिंकू सिंग यांची विकेट काढून कोलकात्याला 179 धावांपर्यंत रोखले. नूरने 31 धावांत 4 विकेट घेत पर्पल पॅपच्या रेसमध्ये पुन्हा उडी घेतली.