हैदराबादकडून कोलकात्याचा धुव्वा, वॉर्नर-बेकरोस्टो जोडीचा शतकी धमाका

सामना प्रतिनिधी ।  हैदराबाद

डेव्हिड वॉर्नर (67) व जॉनी बेअरस्टो (नाबाद 80) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सचा 9 फलंदाज आणि तब्बल 30 चेंडू राखून धुव्वा उडवला. महत्त्वपूर्ण 3 बळी टिपणारा खलील अहमद या सामन्याचा मानकरी ठरला.  

नरीनची टॉप गेअर फलंदाजी

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला सुनील नरीनने आपल्या नेहमीच्या टॉप गेअर शैलीत जबरदस्त सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या 8 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार व 2 षटकारांसह 25 धावांची संक्षिप्त पण देखणी खेळी केली. खलील अहमदने नरीनचा त्रिफळा उडवून हे वादळ शांत केले. नरीन परतल्यावर कोलकात्याचे मधल्या फळीतील अन्य फलंदाजही लवकर बाद झाले.  

मोठ्या भागीदारीने साकारला विजय

कोलकाता नाइट रायडर्सकडून मिळालेले 160 धावांचे लक्ष्य सनरायझर्स हैदराबादने 15 षटकांत केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो जोडीने 12.2 षटकांत 131 धावांची खणखणीत सलामी देत हैदराबादला विजयाच्या दारापर्यंत आणले. डावखुरा मध्यमगती गोलंदाज पृथ्वी राजने वॉर्नरला पायचित करून अखेर ही जोडी फोडली. वॉर्नरने 38 चेंडूंत 67 धावा फटकावताना 3 चौकारांसह 5 षटकारांची आतषबाजी केली. वॉर्नर बाद झाल्यानंतर बेअरस्टोने आलेल्या कर्णधार केन विल्यम्सनच्या (नाबाद 8) साथीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. बेअरस्टोने 43 चेंडूंत 7 सणसणीत चौकार व 4 टोलेजंग षटकारांसह नाबाद 80 धावांची खेळी सजवली. त्याने पीयूष चावलाला चौकार व सलग दोन षटकार ठोकून रुबाबात सामना संपवला.  

मधली फळी कोसळली

नरीन बाद झाल्यानंतर शुभमन गील (3), नितिश राणा (11) व कर्णधार दिनेश कार्तिक (6) ही कोलकात्याची आघाडीची फळी कोसळली, मात्र आघाडीवीर ख्रिस लीनने एक बाजू लावून धरत अर्धशतकी खेळी केली. 47 चेंडूंत 4 चौकार व एका षटकारासह 51 धावांची खेळी करणार्‍या लीनला खलीलनेच विल्यम्सनकरवी झेलबाद केले. त्यानंतर रिंकू सिंग (30), आंद्रे रस्सेल (15) व केसी करिअप्पा (नाबाद 9) यांनी कोलकात्याला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. हैदराबादकडून खलील अहमदने सर्वाधिक 3 बळी टिपले. भुवनेश्वर कुमारने 2 तर संदीप शर्मा व राशिद खान यांनी 1-1 गडी बाद केला.