
कोंढाळी ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे. याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर नगर पंचायतीची निवडणूक घ्यावी लागणार आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या ज्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोंढाळी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली ती रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी जिल्हाधिकाऱयांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाला केली.
कोंढाळीला नगर पंचायतीचा दर्जा मिळावा अशी गेल्या अनेक दिवसांची येथील नागरिकांची मागणी होती. यामुळे या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी पुढाकार घेऊन तसा प्रस्ताव तयार केला. यानंतर ग्रामपंचायत कोंढाळी, पंचायत समिती काटोल व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱयांमार्फत तो अहवाल नगर विकास विभागाला सादर करण्यात आला होता. कोंढाळीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यासाठी या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेतही आवाज उठविला होता, अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली.
आता भाजपा नेते कुठे गेले?
कोंढाळीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यासाठी या भागाचे आमदार अनिल देशमुख तसेच जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी प्रयत्न केले. त्यासाठी आम्ही मंत्रालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर कोंढाळीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. परंतु कोणतेही प्रयत्न न करता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे आम्हीच केले असा गवागवा केला होता. आता ग्रामपंचायतीची निवडणूक का लागली? आता भाजपाचे नेते कुठे गेले? असा सवाल कोंढाळीचे उपसरपंच स्वप्नील व्यास यांनी केला आहे.
























































