
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपपत्रात मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या आई वडीलांना अटक न करण्यासाठी तब्बल 50 हजारांची लाच मागणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक हर्षदा बाळासाहेब दगडे व पोलिस शिपाई अभिजीत विठ्ठल पालके यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 27 वर्षीय तरुणाने एसीबीकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
कौटुंबिक हिंसचारप्रकरणी तक्रारदारासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपपत्रात तक्रारदारांच्या बाजूने मदत करण्यासाठी व त्यांच्या आई, वडील तसेच बहीणीला अटक न करण्यासाठी एपीआय दगडे आणि पालके यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने केलेल्या अर्जाची 28 सप्टेंबरला एसीबीने पडताळणी केली. त्यावेळी दोघांनी लाच मागितल्याचे उघडकीस आले.
































































