कोंडिवली धरणात आठ वर्षाच्या मुलासह दोघे बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरणात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील कोंडिवली धरणात आठ वर्षाच्या मुलासह दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून धरणात बुडालेले दोघेही निळीक गावाचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार तालुक्यातील निळीक येथील इम्रान याकूब चौगुले (40) आणि सोहान फैजन चौगुले (8) हे दोघे कोंडिवली धरणावर फिरण्यासाठी गेले होते धरणाच्या पाण्यात दोघेजण बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी धरणावर धाव घेतली मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ खेड पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

दुर्घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ कोंडिवली धरणावर धाव घेत धरणात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यास सुरवात केली. धरणात मोठ्या प्रमाणात असलेले पाणी आणि महाकाय मगरींचा वावर यामुळे शोध घेण्यावर मर्यादा येत होत्या. मात्र पोलिसांनी शोधकार्य सुरूच ठेवले होते. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास धरणातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आहे.

रात्री उशिरा पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. धरणावर फिरण्यासाठी गेलेले ते दोघे धरणाच्या पाण्यात कसे पडले हे स्पष्ट झाले नसल्याने ही दुर्घटना कि आत्मघात ? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. चार दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरणात चारजण बुडाले होते त्यातील दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले होते तर दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना खेड तालुक्यातील कोंडिवली धरणात आठ वर्षाच्या मुलासह दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.