रत्नागिरी-सिंधुदुर्गात 60 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 60 टक्के मतदान झाले. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून 1942 मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरू झाले.14 लाख 54 हजार 524 मतदारांपैकी 8 लाख 72 हजार 714 मतदारांनी हक्क बजावला.शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी आपण प्रचंड मताधिक्याने विजयी होऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 14 लाख 54 हजार 524 मतदार आहेत.त्यामध्ये 7 लाख 42 हजार 478 महिला आणि 7 लाख 12 हजार 34 पुरुष मतदार आहेत.12 इतर मतदार आहेत.1942 मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात आहेत.महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे डॉ. राणे, काँग्रेस आघाडीच्यावतीने नवीनचंद्र बांदिवडेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती जोशी, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीतर्फे राजेश दिलीप जाधव, बहुजन समाज पार्टीतर्फे किशोर वरक, समाजवादी फ़ॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय गांगनाईक, अपक्ष विनायक लवू राहत, पंढरीनाथ आंबेरकर, बहुजन मुक्ता पार्टीचे भीकूराम पालकर, अपक्ष नारायण गवस,नीलेश भातडे रिंगणात आहेत.

मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले.1942 मतदान केंद्रावर 10 हजार 68 कर्मचारी काम करणार आहेत.तसेच 3467 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.त्यामध्ये रत्नागिरीत एक पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक,4 पोलीस उपअधीक्षक,10 पोलीस निरीक्षक,81 उपनिरीक्षक,1706 पोलीस कर्मचारी आणि सिंधुदुर्गात एक पोलीस अधीक्षक,एक अपर पोलीस अधिक्षक,4 पोलीस उपअधीक्षक,15 पोलीस निरीक्षक,97उपनिरीक्षक,1547 पोलीस कर्मचारी सहभागी होते.राज्य राखीव दलाच्या चार तुकडया,केंद्रीय पोलीस दलाच्या चार तुकडय़ा,गृहरक्षक दलाचे 726 कर्मचारी तैनात ठेवण्यात आल होते.यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर,रॅम्प,वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.रत्नागिरी-सिंधुदुर्गात 5828 दिव्यांग मतदार होते.सकाळी मतदानापूर्वी होणाऱया प्रात्यक्षिकाच्यावेळी रत्नागिरी तालुक्यांतील मिरजोळे गावातील हनुमान नगर आणि लक्ष्मीवाडी येथील मतदान केंद्रावरील यंत्र बंद पडले होते.मात्र त्यानंतर ते मतदान यंत्र बदलण्यात आले.

सकाळपासून उत्साह

मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली.पहिल्या दोन तासांत 10.27 टक्के मतदान झाले.नऊ वाजल्यानंतर मोठया प्रमाणात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. 11 वाजेपर्यंत 21.59 टक्के मतदान झाले. अकरा वाजेपर्यंत मतदानाचा आकडा 35.69 टक्क्यांवर पोहचला. ऊन वाढताच मतदानाचा वेग मंदावला. दुपारी तीन वाजेपर्यंत 45.10 टक्के मतदान झाले. सायंकाळी चारनंतर मतदान केंद्रावर पुन्हा रांगा दिसल्या.पाच वाजेपर्यंत 55.10 टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. वयोवृध्द मतदारांनीही आज मतदानासाठी उत्साह दाखवला. एकूण सरासरी 60 टक्के मतदान झाले. त्यामध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 59.20 टक्के, चिपळूण विधानसभा मतदारसंघात 52.78,राजापूर विधानसभा मतदारसंघात 51.02 टक्के, कणकवली विधानसभा मतदारसंघात 54.82 टक्के, कुडाळ विधानसभा मतदारसंघात 60.17 टक्के, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 65 टक्के मतदान झाले.