छाया भिडे यांनी कोकणातील “रानमेव्याला” घडविली परदेशवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातील रानमेवा समजल्या जाणाऱ्या जांभूळ या फळाला परदेशवारी घडवली आहे , ती छाया उदय भिडे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या गावातील छाया भिडे यांनी या जांभळाना फक्त परदेशवारीच घडवली नाही, तर स्थानिकांना रोजगारदेखील उपलब्ध करुन दिला आहे. छाया भिडे या जांभूळ या फळाची पोळी तयार करुन त्याला बाजारपेठेत विकतात. स्थानिक बाजारपेठांसोबतच या जांभूळपोळीला चक्क ऑस्ट्रेलियामधूनही मागणी आहे.

पूर्णतः नैसर्गिक असलेली ही जांभूळपोळी देशातील अनेक राज्यात विक्रीकरिता पाठवण्यात येते. हल्ली तर त्याची विक्री ऑस्ट्रेलियातही होत आहे. मधुमेह या रोगावर अतिशय गुणकारी असलेल्या या जांभूळपोळीला देशभरातून मागणी आहे. जांभूळ फळ हे मधुमेहावर गुणकारी आहे. हे फळ हंगामी असल्याने त्यावर संशोधन करुन, वेगवेगळे प्रयोग करुन भिडे यांनी जांभूळपोळीची निर्मिती केली, जी बारमाही टिकू शकते.

विक्रीसाठी येणाऱ्या जांभळांचे प्रमाण कमी अधिक असते, तसेच ती उन्हात सुकवण्यात येत असल्याने हवामानावरदेखील अवलंबून रहावे लागते, भिडे यांची ही जांभूळपोळी संपूर्णतः नैसर्गिक आहे. ती टिकवण्यासाठी तिच्यात कोणत्याही कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यात येत नाही. तसेच जांभूळ सुकवण्यासाठीदेखील ड्रायर यंत्राचा वापर केला जात नाही. सुर्य़प्रकाशातच ती वाळवण्यात येतात. छाया भिडे यांच्या या व्यवसायामुळे कोकणातील या रानमेव्याला चांगला दर मिळू लागला आहे. पूर्वी अल्पदर मिळत असलेल्या जांभळांना आता भिडे कुटुंबीय 20 ते 22 रुपये प्रतिकिलोने विकत घेतात. त्याशिवाय भिडे यांच्या या उद्योगामुळे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधीदेखील मिळाली आहे. हवाबंद पॅक केल्याने ही जांभूळपोळी वर्षभर टिकते. बाजारपेठेत जांभूळ पोळीला मोठी मागणी देखील होत आहे .

सुरुवातीच्या काळात त्या स्वतःच जांभुळपोळी तयार करत होत्या. गावातील जांभळे गोळा करुन, ती स्वच्छ करुन त्याचा रस काढून ते पोळी तयार करुन सुकवेपर्यंत सर्व कामे घरातल्या माणसांद्वारे केली जात असत. सुरुवातीच्या काळात तर जांभळांचा रस मिक्सरवर काढण्यात येत होता, त्यामुळे या कामाला वेळ फार लागत असे. कालांतराने त्यांनी एक यंत्र तयार करुन घेतले, ज्यावर जांभळांचा रस काढता येतो आणि त्याची पोळी तयार करता येते . सध्या छायाताई देवरुख गावासोबतच शेजारील गावांमधील जांभळेदेखील विकत घेतात. त्यामुळे ग्रामीण भागातील वाया जाणारी जांभळे आता उत्पन्नाचे साधन बनले आहे .